Attack on Hindu : बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात अमरावतीमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात दोन नेत्यांच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. शिवसेनेने या मोर्चात बंदूक पुरविण्याची भाषा केली. भाजप खासदाराने तर चक्क पहिली बंदूक आपल्याला द्यावी, अशी जाहीर मागणीच करून टाकली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अमरावतीमध्ये झालेल्या एका दंगलप्रकरणी भाजपच्या या खासदाराचेही नाव होते.
सकल हिंदू समाजाच्यावतीने अमरावतीत मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख भागातून हा मोर्चा जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात इर्विन चौकात पोहोचला. यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते नानकराम नेभनानी म्हणाले, महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या. बंदुकी मी घेऊन देईल. दोन चार लोकांचा जीव गेला तरी चालेल पण वाईट माणूस वाचायला नको. आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, महिलांना बंदुकीची परवानगी द्यावी. विशेषतः अमरावतीमध्ये परवानगी दिली तर मी माझ्याकडून बंदूक घेऊन देईन. आता आत्मसंरक्षणासाठी बंदूक ठेवावी लागणार आहे. अशात एखाद्या वाईट व्यक्तीला संपवावे लागले तर कोर्ट-कचेरीचा खर्चिही आपण करू.
पहिला माझा नंबर
कार्यक्रमात बोलताना खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, नेभनानी म्हणत होते प्रत्येकाकडे बंदूक देतो. इतरांना द्यायची की नाही ते मला माहीत नाही. पण आधी मला द्यावी. कारण मला आता जास्त गरज आहे. सर्वांना लढता आले पाहिजे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निवीर सारख्या योजना आणली. पण विरोधक त्यालाही तयार नाहीत. विरोधकांना भारताचा बांगलादेश करायचा आहे. हिंदूंवर अत्याचार करायचे आहेत. जगात मंदिर कोणी तोडले, बुद्धांच्या मूर्ती कोणी तोडल्या तर त्या बादशाहांनी. जगात असे कधी ऐकले का की, कुठल्या हिंदूंनी कुठल्या मंदिर किंवा मशिदीवर हल्ला केला, असा सवालही डॉ. बोंडे यांनी केला. लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद होत असेल तर धावून जा. हिंदूंना जागे होण्याची वेळ आली आहे. हिंदू जागा झाला तर काय होते, हे बांगलादेशाने पाहिले आहे, असेही ते म्हणाले.