Assembly Election : काँग्रेसने आजपर्यंत लुटण्याचं काम केलं. मात्र महायुती सरकार देणाऱ्यांचं सरकार आहे. सध्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दरमहा देण्यात येत आहेत. लवकरच महायुतीचं सरकार पुन्हा येणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हजार 100 रुपये दरमहा पाठविण्याचं काम सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
बाळापूरला भेट देण्यासाठी आपण आलो आहे. बाळापूर तालुक्यात लिंबू प्रक्रिया उद्योग देऊ. महाविकास आघाडीवर 20 तारखेला लिंबू फिरवा त्यानंतर प्रक्रिया उद्योग घेऊन जा, अशी ग्वाही देखील शिंदे यांनी दिली. बाळापूरच्या जवळच औष्णिक वीज केंद्र आहे. त्याच्या विस्तार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात कोणीही उपाशी झोपणार नाही. त्यासाठी मोफत अन्नधान्य पुरवठ्याची योजना सुरू करण्यात आली आहे.
काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये अद्यापही योजना सुरू झालेल्या नाही. काँग्रेस गरीबांना लाभ देऊच शकत नाही, असा दावा शिंदे यांनी केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गळचेपी महाविकास आघाडीत होत होती. त्यामुळं आम्ही बाहेर पडल्याचं शिंदे म्हणाले. महायुतीचं सरकार हे बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारं सरकार असल्याचंही शिंदे म्हणाले.
आता जाग आला
महायुती सरकारने ज्या योजना आधीच सुरू केल्या आहेत, त्या योजनांबद्दल आता महाविकास आघाडीचे नेते बोलत आहेत. आम्ही आधी देणं सुरू केलं. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाग आल्याचं शिंदे म्हणाले. या योजना सुरू करायच्याच होत्या तर आतापर्यंत कोणी थांबविलं होतं, असा सवालही त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घरातून सरकार चालायचं. घरातून कधी सरकार चालतं का? व्हिडीओ कॉन्फरन्सवरून निर्णय होतात का? असा प्रश्न करीत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा टोला लगावला. केंद्र आणि राज्य सरकारचं डबल इंजिन महाराष्ट्राचा विकास करीत आहे.
महाराष्ट्राचा विकास पाहून अनेकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळं त्यांनी कोर्टात केसेस दाखल करणं सुरू केलं आहे. परंतु त्यांना लक्षात आलं की यामुळं आपल्यालाच फटका बसेल त्यामुळे कालपर्यंत बोंबा मारणारे आता स्वत: महिलांना रक्कम देण्यासाठी तयार झाल्याची टीका शिंदे यांनी केली. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू आहे. अनेक नेते दिल्लीला जाऊन पाया पडत आहेत. मात्र महायुतीला जनतेच्या विकासाचा ध्यास असल्याचंही शिंदे म्हणाले.
जाधवांना सूचना
मुख्यमंत्र्यांच्या सभेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे देखील होते. सभेत शिंदे यांनी जाधव यांना खास सूचना केली. बाळापूरच्या विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा. बाळापूरचे प्रश्न जाणून घ्या. केंद्रात आपलं सरकार आहे. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येणार आहे. असं झालं तर केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे बाळापूरच्या समस्या सोडविण्यासाठी काम करू, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.