खरिप व रब्बी हंगामातील पीकविम्याचे पैसे शेतकर्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ४७ हजार ७०७ पात्र शेतकर्यांच्या खात्यावर ११२ कोटी २९ लाख रुपये जमा होणार आहेत. शेतकर्यांच्या हक्काचा पीकविमा मिळवून देण्यात सरकारला यश आले, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. तर बैठकीतील निर्णयाची राज्य सरकारने अमलबजावणी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार मानले आहेत. या पीकविम्याचे श्रेय महायुती सरकारला दिले आहे. दुसरीकडे, आपल्या मुक्काम आंदोलनाच्या दणक्यामुळेच हा पीकविमा जमा होत असल्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे सध्या पीकविमा चुकाऱ्यावरून श्रेयाची लढाई सुरु असल्याचे दिसून येत आहे.
राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात खरिप आणि रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यामध्ये पीकविम्याचे पैसे जमा होण्याला सुरुवात झाली आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील व पीकविमा कंपनी यांच्यात बैठक झाली होती. बैठकीत काही निर्णय झाले. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार ५४७ शेतकर्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ होणार आहे. असे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. बुलढाणा जिल्ह्यात २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षी खरिप आणि रब्बी हंगामामध्ये अतिवृष्टी होऊन शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
झाली होती बैठक
या नुकसानाचे पंचनामे झाले. त्यानंतर प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पैसे मिळण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या महिन्यात राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीं आणि पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या बैठक झाली होती. या बैठकीमध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हेदेखील सहभागी झाले होते. शेतकर्यांच्या नुकसान भरपाईची प्रकरणे त्वरित निकाली काढावी. शेतकर्यांच्या खात्यात पीकविमा कंपनीचे पैसे जमा करण्यात यावे. यासंदर्भात पीकविमा कंपनीच्या अधिकार्यांना निर्देशित करण्यात आले होते.
त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये सन २०२३-२४ खरीप हंगामांतर्गत २ लाख ४३ हजार १४६ शेतकर्यांना २३३.६५ कोटी रुपये, रब्बी हंगामात २५६१ शेतकर्यांना १.६ कोटी रुपये, सन २०२३-२०२४ खरीप हंगामाअंतर्गत २ लाख २१ हजार ५५८ शेतकर्यांना १३८.८४ कोटी रुपये आणि रब्बी हंगामांतर्गत ५६ हजार ९८९ शेतकर्यांना १२५.२३ कोटी रुपये असे बुलढाणा जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार ५४७ शेतकर्यांच्या खात्यामध्ये २६४.०७ कोटी जमा होणार आहे.
शेतकर्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची कारवाई सुरू झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी महायुतीच्या लोकप्रतिनिधीनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत बैठक घेतली. प्रलंबित नुकसान भरपाईचे दावे मंजूर करून घेतले. त्यामुळे शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे, असे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केलेले आहे.
Forest Minister : आदिवासी कुटुंबांसाठी वनमंत्र्यांकडून आनंदवार्ता
मुक्काम आंदोलन
तर दुसरीकडे, या पीकविमा जमा होण्याचे श्रेय घेण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचीही यंत्रणा पुढे आली आहे. पीकविम्याच्या प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २६ सप्टेंबरला बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ‘मुक्काम आंदोलन’ सुरू केले होते. आंथरूण पांघरूण आणि बॅग घेऊनच ते जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात पोहोचले होते.
जोपर्यंत शेतकर्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली होती. पीकविमा कंपनीने बुलढाणा जिल्हातील १ लाख २६ हजार २६९ अपात्र शेतकर्यांचा पीकविमा मंजूर करत असल्याचे लेखी पत्र रविकांत तुपकरांना दिले. सरकारकडून पैसे प्राप्त होताच या शेतकर्यांच्या खात्यावर २३२ कोटी ४८ लाख रूपये जमा होणार आहे.
सर्वांच्या प्रयत्नांमुळे शेजाऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळत आहे. असे असले तरी सध्या श्रेयाची लढाई सुरु आहे. मात्र श्रेय कुणीही घ्या, आम्हाला पीकविमा मिळाल्याचे समाधान आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.