Political War : लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफुस वाढली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने नुकसान झाल्याचं भाजप-संघ परिवाराकडून सातत्यानं बोललं जात आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तर शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. अशात आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘महायुतीचा धर्म फक्त राष्ट्रवादीनेच पाळायचा का?’ असा संतप्त सवाल केला आहे.
तानाजी सावंत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून महायुतीत पुन्हा वाद रंगण्याची शक्यता आहे. ‘राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही. मांडीला मांडी लावून बसलोय. पण बाहेर आल्यावर उलट्या होतात,’ असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं. त्यावरून महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला महाविकास आघाडीच्या तुलनेत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांनतर महायुतीत सामील असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर अनेकदा याचं खापर फोडण्यात आलं. तर दुसरीकडे महायुतीच्या घटकपक्षातील नेत्यांमध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा महायुतीतील शिवसेनेचे नेते मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार गटावर जहरी टीका केली आहे. यावरून राज्यात पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. सावंताच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे. तर आमदार अमोल मिटकरींनी तानाजी सावंत यांच्यावर आरोप केले आहेत.
Assembly Election : शिंदे गटाच्या या आमदाराची उमेदवारी धोक्यात?
तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?
मंत्री तानाजी सावंत यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नसल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही. हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही,’ अस तानाजी सावंत म्हणतात.
मिटकरींचं प्रत्युत्तर!
तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनीही जहरी टीका केली आहे. मिटकरी म्हणाले, ‘तानाजी सावंत ही व्यक्तीच संशोधनाचा विषय आहे. हाफकीन संस्था या व्यक्तीला माहीत नाही. खेकडा धरण फोडू शकतो असा शोध लावणारा ही व्यक्ती काहीही बोलू शकते.’ ‘त्यांच्या पोटात राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसल्याने मळमळ होत आहे. तर त्यांनी बुमपरांड्यातील साखर कारखाण्याच्या उद्घाटनासाठी अजित पवारांना कशाला बोलावलं?’ असा सवालही मिटकरी यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी
यासंदसर्भात मिटकरी यांनी फोटोसह ट्विटही केलं आहे. उद्घाटनाला बोलवायचं आणि राष्ट्रवादीशी पटत नाही असं जनतेला सांगायचं. असे वक्तव्य आरोग्य मंत्र्यांनी करणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी. महायुतीत तानाजी सावंतांनी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, असा सल्लाही मिटकरींनी दिला आहे. तोंडाचे पट्टे चालवणारी ही पाचवी व्यक्ती आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतलेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.