Bajrang Sonwane : लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला शरद पवार गटाच्या तुलनेत अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान निकालानंतर आता दोनही गटांकडून आमदार – खासदार संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांच्या आजच्या (11 जुन) दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आमदार मिटकरी यांनी एक्स वर केलेल्या ट्विटच्या माध्यमातून बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
मिटकरींच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. बीडच्या बाप्पांचा दादांना फोन आल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. तर यावर बोलताना खासदार बजरंग सोनवणे यांनीही मिटकरींना प्रत्युत्तर देत म्हणाले की, मिटकरींनी अगोदर एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून आणावा नंतर दुसर्याबद्दल बोलावे.
दावे प्रतीदाव्यांना आला वेग
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून दावे- प्रतिदावे करण्याला वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादीच्या दोनही गटात सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार वाढले आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे भाजप मध्ये जाणार असल्याचं म्हटलं होतं.
मिटकरींचा नवा दावा
अमोल मिटकरी यांनी पुन्हा एक नवा दावा केला आहे. बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना पराभूत करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ‘जायंट किलर’, खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अजित पवार गटाचे मिटकरी यांनी केला आहे. बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचे, अमोल मिटकरी यांनी एक्स वर केलेल्या एका ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. अमोल मिटकरींच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
NEET Exam : नाना म्हणतात, सरकार झाले धीट, घोटाळे करतात ‘नीट’
तर माध्यमांशी बोलताना, अमोल मिटकरी म्हणाले, एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा दिसत आहे, मी जे बोलत आहे लवकर मोठा पिक्चर तुम्हाला दिसेल. अजित पवार हे राज्याच्या केंद्रस्थानी महत्त्वाची व्यक्ती आहे, हे सिद्ध होत आहे. एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुराचा प्रश्न असेल आणि तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल आणि तो दादांना विनंती करत असेल, तर माझ्या सारख्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आमदाराला ही भूषणावाह बाब आहे.
तुम्ही आज ट्रेलर पाहिला आता विरोधकांकडून स्पष्टीकरण साहजीक आहे. आता आम्ही पण वाट पाहतो की, ते काय स्पष्टीकरण देतात. माझं चुकीचे असेल संबंधित नेत्यांचे कॉल डिटेल्स काढा तुम्हाला कळेल. असा दावा देखील मिटकरी यांनी केला. तर दुपारी देखील फोन येऊन गेल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी तुम्ही बघा ‘आगे, आगे देखो होता है क्या? असेही मिटकरी म्हणाले.
खासदार बजरंग सोनवणे म्हणाले!
अमोल मिटकरींच्या दाव्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बजरंग सोनावणे म्हणाले, अमोल मिटकरींनी लोकसभेत एखादा खासदार निवडून आणायला पाहिजे होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांविषयी बोलावे. मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांसोबत राहणार आहे. अमोल मिटकरी यांनी गोंधळ निर्माण करण्याचे प्रकार बंद करावे. अगोदर एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून आणावा नंतर बोलावे. मी फोन करण्याचा संबंधच कुठे येतो? राजकारणाच्या प्रक्रियेत काही वैयक्तिक विषय असतात. वैयक्तिक विषयाला राजकारणात आणतात. मिटकरींनी दिशाभूल करण्याचा प्रकार बंद करावा. असे बजरंग सोनवणे म्हणाले.