महाराष्ट्र

Amol Mitkari : महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या बापाचा नाही!

NCP Politics : आमदार अमोल मिटकरी आक्रमक; इशारा कोणत्या नेत्याकडे?

Twitter Post : आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या एक्स या सोशल मीडियावर खरमरीत टीका केली आहे. त्यांनी लिहिलेले शब्द कुणासाठी आहेत, याचा राजकीय वर्तुळाला निश्चित अंदाज आहे. पण मिटकरी यांनी नाव न घेता टीका केली आहे. मिटकरी यांनी केलेल्या पोस्ट मध्ये ‘महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या बापाचा नाही’, असं म्हटलं आहे. मिटकरींनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसे असल्यास राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी अकोल्यातील विश्राम गृह येथे आमदार मिटकरींच्या वाहनाला लक्ष केले. त्यानंतर या प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत एक विधान केलं होतं. ‘महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरज नाही’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले.

राज ठाकरे धाराशिवच्या दौऱ्यावर असताना तेथील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. यावेळी काही मराठा आंदोलक राज ठाकरेंचा मुक्काम असलेल्या थांबलेल्या हॉटेलमध्ये शिरले आणि जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे यावर आता यावर आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांना लक्ष केलं आहे, असं बोललं जात आहे. ‘वाघांनी सुपारीबहाद्दराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखविली. ये वो शेर है जो रुकते नही, थकते नही, झुकते नही और बिकते भी नही…, आज समजलं असेल महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या बापाचा नाही’, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

मिटकरींचं नेमकं ट्विट काय!

‘वाघांनी सुपारीबहाद्दराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखविली. ये वो शेर है जो रुकते नही, थकते नही, झुकते नही, और बिकते भी नही… आज समजलं असेल महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या बापाचा नाही..#ट्रेलर’ असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे. यात त्यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही.

पूर्वी काय घडलं?

मिटकरींनी राज ठाकरे यांंच्यावर टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर एका पदाधिकाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू देखील झाला होता. आमदार मिटकरी विरुद्ध मनसे असा संघर्ष पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा आमदार मिटकरींनी राज ठाकरे यांच्या वर टीका केल्याने काय प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!