(या लेखातील मते लेखकाची आहेत. त्या मतांशी ‘द लोकहित’ सहमत असेलच, असे नाही)
निवडणुकीतील राजकारण मोठे गहन असते. सामान्यांना त्यातले फारसे कळत नाही. राजकीय नेत्यांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाजही कोणाला घेता येत नाही. ते मात्र सर्व परिस्थितीचा अंदाज आणि वेध घेत असतात. नेमके कोणते पाऊल उचलणे उचित राहील याचा अभ्यास करतांनाही ते दिसतात. त्यांनी घेतलेले निर्णय पुढचा राजकीय विचार करून घेतलेले असतात. काही वेळेस बिकट परिस्थिती उद्भवते. अशा वेळी कोणता निर्णय घ्यावा हेच कळत नाही.
एकीकडे राजकारण, दुसरीकडे ऋणानुबंध आणि जुने मैत्रीपूर्ण संबंध यांचा ताळमेळ साधून निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय घेताना एखाद्यावर अन्याय होण्याची शक्यता असते. माहीम विधानसभा मतदारसंघात असाच पेच निर्माण झाला आहे. माहीम दादर मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अगदी पहिल्यांदा निवडणूक लढवत असूनही त्यांना तेथून जिंकायचे आहे. आता राज पुत्र रिंगणात असल्याने मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी आणि चुरसीची ठरत आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत अमित ठाकरे यांचे विरोधात शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गटाने सदा सरवणकर या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. सदा सरवणकर शिवसेनेचे प्रामाणिक आणि निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात.त्यांच्या उमेदवारीने अमित ठाकरे अडचणीत येऊ शकतात. मैत्रीचे नाते जपत महायुतीने त्यांना समर्थन द्यावे, अशी मागणी आशीष शेलार यांनी केली आहे. आशीष शेलार राज ठाकरे यांचे जवळचे मित्र मानले जातात.
अमित ठाकरे यांच्या विजयासाठी सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुती ला बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढतो आहे. स्वबळावर निवडणूक जिंकणे सोपे नाही याची जाणीव राज ठाकरे यांना सुद्धा आहे. त्यामुळे या मतदार संघात राजकारणातील बुद्धीबळाचे नवे डाव टाकले जात आहेत.
महायुती ने समर्थन द्यावे
महायुती ने अमित ठाकरे यांना समर्थन द्यावे, अशी आशीष शेलार यांची वैयक्तिक भूमिका आहे. या संदर्भात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचे सोबत चर्चा करणार आहेत. आशीष शेलार म्हणतात महायुतीने एक नाते जपायला हवे. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असेल तर महायुती एकत्र येऊन समर्थन देऊ शकते. आमचा सदा सरवणकर यांना विरोध नाही असे त्यांनी स्पष्ट केले. महायुती म्हणून सर्वांनी एक चांगली भूमिका घ्यावी, त्यातून जनतेला एक चांगला संदेश जाईल असे मतही त्यांनी नोंदविले. राज ठाकरे यांनी सतत हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे वेळोवेळी आपल्याला मदतही केली आहे, त्यांनी आतापर्यंत नाते संबंध जोपासले आहेत तसेच नाते आपणही जपायला हवे असे स्पष्ट मत आशीष शेलार यांनी व्यक्त केले.
या सुरू असलेल्या प्रकरणावर शिवसेना नेते उदय सामंत यांनी सावध भूमिका घेतली. सदा सरवणकर यांनी पडत्या काळात खूप मदत केली आहे. त्यांना या मतदार संघातील उमेदवारी मिळाली यात कुठलिही चूक नाही असे त्यांनी स्पष्ट केले.याच मतदार संघातून राज ठाकरे या़चे चिरंजीव निवडणूक लढवत असल्याने काय निर्णय घ्यायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठरवतील असेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीचा अनुभव घ्यावा
वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात. ही निवडणूक महायुद्धासारखी लढली जाईल असे मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. अमित हा आपल्या घरातील मुलगा आहे हे खरे असले तरी निवडणूक ही लढावी लागेल. निवडणूक लढवून मुलांनी अनुभव घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला.
निवडणूक लढण्यावर ठाम..
शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. जनतेच्या विश्वासाच्या बळावर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. आपण नक्कीच विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आशीष शेलार यांचा प्रस्ताव त्यांनी व्यक्तिगत ठरवून फेटाळला. आशीष शेलार जे बोलले ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. राज ठाकरे यांच्या प्रेमापोटी ते बोलले. पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे पक्षहिताचा विचार करून निर्णय घेतील असेही ते म्हणाले.
माहीम हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. येथे शिवसेना आणखी मोठी होण्याची गरज आहे. असे स्पष्ट मत त्यांनी नोंदविले. लोकांना सहज भेटणारा, त्यांचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी अशी मतदार संघातील जनतेची अपेक्षा असते, असा टोलाही त्यांनी मनसे नेत्यांचे नाव न घेता लगावला. मागचे दरवाजे मला पसंत नाहीत, मागच्या दाराने मी खेळणार नाही. समोरासमोर खेळणार आणि जिंकणार अशी आक्रमक भूमिका सदा सरवणकर यांनी मांडली. आपल्यावर कुणाचा दबाव नाही. आपण शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मतदार संघात पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. मतदार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत असेही ते म्हणाले.
आगे बढोच्या घोषणा
सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेऊ नये , त्यांनी लढावे अशी मागणी माहीम येथील सदा सरवणकर यांच्या चाहत्यांनी केली आहे. शिवसेना कार्यालयासमोर महिलांनी सदा सरवणकर या़च्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. माहीम का आमदार कैसा हो , सदा सरवणकर जैसा हो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला
सत्तेत ‘राज’ करण्याची घाई..
अमित ठाकरे या नवख्या उमेदवाराच्या राजकीय प्रवेशासाठी माहीम मध्ये टोकाचे राजकारण खेळले जात आहे. अमित ठाकरे सहज कसे विजयी होतील याची आखणी केली जात आहे. सक्रिय राजकारणाचा गंध नसलेल्या तरुणासाठी मोठे नेते कामाला लागले आहेत. मनमुरादपणे फुलणा-या घराणेशाहीच्या राजकारणात आणखी एका सदस्याला सहजपणे प्रतिष्ठापीत करण्यासाठी आता मैत्री ची प्रेमळ साद घालण्यात येत आहे. आपले ऋणानुबंध जोपासण्यासाठी नेत्यांचे सुरू असलेले प्रयत्न बघून निष्ठावंतांची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला सत्तेत राज करायची घाई झाली आहे. नवख्या उमेदवाराच्या राजकीय प्रवेशासाठी वेगळा नाट्यप्रयोग सुरू झाला आहे. अमित च्या विजयासाठी निष्ठावंत नेते सदा सरवणकर यांना थोडे थांबा, वाट बघा असा प्रेमळ सल्ला दिला जाऊ शकतो.