Amit Shah : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अकोल्यातील सभा रद्द झाली आहे. योगी यांच्याऐवजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता आपल्या सभा घेणार आहे. अकोल्यातील सभेतून अमित शाह हे हिंदुत्वाचा शंखनाद करणार आहेत. अकोल्यातील निवडणूक जिंकण्यासाठी विषयांवर भाष्य करण्याची विनंती अमित शाह यांना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केली आहे. त्यानुसार अमित शाह हे अकोल्यामध्ये हिंदुत्वाच्या विषयांना अधिक प्रमाणावर हात घालताना दिसतील, असे सांगण्यात येत आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मोलाचे योगदान ठरणार आहे. या मतदारसंघात आजपर्यंत भाजप केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विजयी झाली आहे. त्यामुळे अकोल्यातील समीकरण पाहता अमित शाह यांना हिंदू आणि हिंदुत्व याच विषयावर जास्त बोलता येईल का? अशी विनंती करण्यात आली आहे.
योगींची सभाही त्यासाठीच
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा हिंदुत्ववादी फायर ब्रँड नेते म्हणून योगी आदित्यनाथ नावारूपास आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगी यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेक्षाही अधिक कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून योगी यांची ख्याती आहे. त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांची सभा अकोला लोकसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आली होती. परंतु काही कारणांमुळे योगी आदित्यनाथ यांची सभा अखेरच्या क्षणी रद्द झाली. योगी यांची सभा रद्द होताच विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
सर्वेक्षणाचा परिणाम
अकोला लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपशी संबंधित संस्थांची अंतिम टप्प्यातील सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणकर्त्यांचे नियंत्रण थेट प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे करीत आहेत. योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द झाल्याने अकोल्यातील बदललेल्या समीकरणांचा आढावा घेतला या सर्वेक्षणकर्त्यांनी घेतला. अकोला भाजपबद्दल नाराज असलेल्या अनेक मतदारांनी योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. मतदारांनी आता किमान अमित शाह यांची तरी सभा घ्यावी अशी आग्रही मागणी केली.
संताप कळविला
अकोला मतदारसंघात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची तरुणांनी मतदारांचा भाजप नेत्यांबद्दल असलेला संताप तातडीने आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाला कळवला. त्यानुसार आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अकोला येथील सभेदरम्यान जास्तीत जास्त आक्रमक आणि हिंदुत्ववादी विषयांवर बोलता येईल का? अशी विनंती राज्यातील नेत्यांनी केंद्राकडे केली आहे. त्यामुळे अकोला मतदारसंघात अमित शाह उद्धव ठाकरे आणि हिंदुत्व या विषयावर अधिक बोलल्यास आश्चर्य वाटू नये.