Clarity In Mahayuti : महाराष्ट्रात सर्वाधिक प्रचंड बहुमतामध्ये महायुतीचे सरकार बनेल. अन् हे सरकार भाजपच्याच नेतृत्वाखाली बनेल, असा ठाम दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. पुण्यात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शाह बोलत होते. शाह यांनी भाजपच्या नेतृत्वात असा वाक्यप्रयोग केल्याने एकनाथ शिंदे यांची धडधड वाढली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झालेत. आता शाह यांनी भाजपच्याच नेतृत्वाखाली बनेल असे नमूद केल्याने भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमित शाह यावेळी म्हणाले, भ्रष्ट्राचाराचे सर्वांत मोठे सूत्रधार शरद पवार आहेत. त्यांनीच भ्रष्टाचाराला संस्थात्मक केले. फेक नरेटिव्ह करून विरोधकांनी थोडा विजय मिळवला. पण विधानसभेत त्यांचा खोटारडापणा बाहेर पडेल. महाराष्ट्रात 2024 मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आहे. 2014 ते 2024 या काळातील तीन निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत.
राहुल गांधी यांच्यावर टीका
अपयश आले तरी देखील राहुल गांधी यांच्यात अहंकार आला आहे. जो जिंकतो त्याचे सरकार असते. भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसले, हे राहुल यांनी पाहावे. हरल्यानंतर राहुल अहंकारीपणाने वावरत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावरही शाह यांनी हल्ला केला. स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारस म्हणणारे आता औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले आहेत. याकुब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर ठाकरे बसले आहेत. झाकिर नाईक यांना शांततादूत बवनण्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले आहेत, असे शाह म्हणाले.
कॉंग्रेसवाले अनेक अपप्रचार करत आहेत. आरक्षणाबाबत अपप्रचार केला. संविधान रद्द होईल हा अपप्रचार केला. आता त्यांचा प्रचार आता चालणार नाही. लोकांना ते खोटे बोलत असल्याचे कळले आहे, असे शाह म्हणाले. शरद पवार यांचे सरकार राज्यात असले की, मराठा आरक्षण गायब होते. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजप सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळते. पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) हे मराठा आरक्षण (Maratha Reservation) गमावले. आता पुन्हा महायुती सरकारने आरक्षण दिले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम हे भाजपनेच केले आहे, असे शाह यांनी नमूद केले.
उत्तराखंडमध्ये भाजपने समान नागरी कायदा आणला आता संपूर्ण देश त्याची वाट पाहत आहे. मात्र खोटा प्रचार करण्यात शरद पवार आणि गँग धन्यता मानते. काँग्रेस सरकारच्या काळात शरद पवार केंद्रात मंत्री होते. तरीही त्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला, असे शाह म्हणाले. पुण्यात गेले दोन दिवस भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे आयोजन केले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे नेते अमित शाह यांच्या भाषणाने झाला. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना केल्या.