BJP Campaign : निवडणुकीच्या प्रचाराचे केवळ चार दिवस शिल्लक असताना भाजप महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत एकाही स्टार प्रचारकाची सभा झाली नव्हती. नामांकन अर्ज भरण्याच्या दिवशी देवेंद्र फडणवीस आले होते. मात्र,त्यानंतर एकही सभा झाली नाही. त्यामुळे चर्चा रंगली होती. अखेर अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 23 एप्रिल रोजी अकोल्यात सभा घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेज मध्ये 26 एप्रिल रोजी अकोला लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी तसेच वंचितच्या प्रचाराला वेग आला आहे. अकोला मतदारसंघात तिरंगी काट्याची लढत होणार आहे. मात्र, उमेदवार स्वतःच खिंड लढवताना दिसत आहे. कारण महायुतीच्या एकाही स्टार प्रचारकाची सभा या मतदारसंघात झाली नव्हती. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा 21 एप्रिल रोजी होणार होती. मात्र, तीही रद्द झाली. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते.
यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले होते. आमदार नितीन देशमुख यांनीही टीका करीत भाजपचा उमेदवार डेंजर झोन मध्ये असल्याचा दावा केला. यावरून चांगलंच राजकारण तापलं असताना आता भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकाचा मुहूर्त सापडला. अशी चर्चा आता अकोल्यात रंगली आहे. अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची सभा क्रिकेट क्लब मैदानावर होणार आहे. अलिकडच्या दीड महिन्यात त्यांचा हा दुसरा दौरा आहे.
चार दिवस राहणार सभांचा धडाका!
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे चार दिवस उरले असताना आता प्रचाराला वेग आला आहे. आता मतदारांपर्यंत पोहचणे शक्य नसल्याने प्रचारसभांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न तीनही उमेदवार करीत आहेत. त्यामुळे उरलेल्या चार दिवसांत विविध राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचाराचा धडाका अकोला लोकसभा मतदारसंघात राहणार आहे.