Wish To Become MLA : आत्राम यांच्या परिवरातील बंडखोरी संतापाना दिसत नाही. महायुतीमधील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री यांनी वडिलांविरोधातच बंडखोरी केली आहे. भाग्यश्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. आता त्या वडिलांविरोधात विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. अशात आत्राम परिवारातून आणखी एकाने बंडाचे निशाण रोवले आहे. अंबरीश राजे आत्राम हे त्यांचे नाव.
आत्राम विरुद्ध आत्राम
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीमध्ये आहे. त्यामुळे गडचिरोलीतून मंत्री धर्मराव बाबा आत्राम पुन्हा विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. अशातच त्यांच्या मुलीनेही निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे गडचिरोलीत आत्राम विरुद्ध आत्राम असा लढा होणार आहे. आता यात आत्राम विरुद्ध आत्राम विरुद्ध आत्राम असे तिहेरी शुद्ध होणार की काय, अशी चिन्हे आहेत. गडचिरोलीची जागा भाजपची असल्याने अंबरीश राजे आत्राम यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे.
काका-पुतण्याचे वैर
पूर्व विदर्भाच्या राजकीय क्षेत्रात अंबरीश राजे आत्राम आणि धर्मराव बाबा आत्राम यांचे वैर सर्वश्रूत आहे. अंबरीश हे धर्मराव बाबा यांचे पुतणे आहेत. महायुतीतून धर्मराव बाबा आत्राम यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारी की काय, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अंबरीश राजे आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. अंबरीश राजे हे देखील निवडणुकीची तयारी करीत आहेत. आता त्यांनी उमेदवारी मिळाली अथवा मिळाली नाही, तरी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. परिणामी गडचिरोलीत महायुतीपुढे तिहेरी पेच निर्माण होणार आहे.
अंबरीश राजे आत्राम हे मंत्री होते. त्यामुळे त्यांना पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. आता त्यांनी धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर जाहीर टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत असल्याने अंबरीश राजे आत्राम यांची तक्रारही करण्यात आली आहे. महायुतीमधील नेत्याविरूद्ध महायुतीमधीलच नेता टीका करीत असल्याने यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे काका-पुतण्याच्या वादात आता वरिष्ठांना मध्यस्थी करावी लागणार आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. काका-पुतण्याचा वाद शांत केला तरी गडचिरोलीतील आत्राम विरुद्ध आत्राम ही लढत अटळ असल्याचे सांगण्यात येत आहे.