Political War : विधानपरिषदेत बोलताना शुक्रवारी (ता. 12) विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ‘सांगून गेली ज्ञानेश्वरी माणसापरं मेंढरं बरी’, असे वक्तव्य केले होते. त्याला भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांना त्यांनी आज शालजोडीतून चांगलेच हाणले.
सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना दरेकर यांनी विरोधी पक्षनेते म्हणाले ‘सांगून गेली ज्ञानेश्वरी, माणसापरं मेंढरं बरी’. असे म्हटले. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ आहेत. त्यामुळे त्यांनी ज्ञानेशरीचाही सन्मान केला आहे. वारकऱ्यांसाठी 20 हजार रुपये प्रत्येक दिंडीला देऊन तीर्थस्थळाचाही विकास करण्याचे काम ‘ज्ञानेश्वर सांगून गेले’ त्याला आदर्श मानून केलाय. महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केले आहे. सर्व सामान्यांसोबत मेंढरांची आणि मेंढपाळांचीही काळजी घेतली आहे, असा मिश्किल टोला दरेकरांनी विरोधकांना लगावला.
सर्वसामान्यांसाठी काम
कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री सर्वसामान्यांसाठी काम करतात. राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था हाताळताना पोलिस प्रशासनेही अत्यंत कठोर भुमिका घेण्यासाठी काम केले आहे. परंतु मुंबईचा आनंद भोईटे नावाचा एक डीसीपी झोन क्र. 11चा आहे. प्रतिभा घाडगे आणि हरिश्चंद्र घाडगे हे वारकरी जोडपे आहे. कांदिवलीत त्यांच्या मालकीचे ट्रॅव्हल्सचे कार्यालय आहे. त्या कार्यालयाचा गाळा कुणाला तरी हवा आहे म्हणून भुमाफियांना हाताशी धरून त्याचे पाणी, वीज कापले व त्यांना बाहेर काढले.
त्यांना स्थानिक डीसीपीचा आशीर्वाद होता, असा आरोपही दरेकर यांनी केला. तसेच यावेळी दरेकर यांनी घाडगे दाम्पत्याची मुख्यमंत्री ते डीसीपी यांना दिलेली तक्रारही सभागृहात वाचून दाखवली. गृहमंत्र्यांनाही याबाबत सांगितले, पत्रही दिले. तेथील नगरसेविका संध्या विपुल दोषी आणि त्यांचे पती दादागिरी करताहेत. तेथील डीसीपी सहकार्य करत नाही. ते स्वतः त्यांच्याशी बोलले तरीही घाडगे दाम्पत्यावर अन्याय सूरु आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा अधिकारी कर्तव्यावर राहता कामा नये. त्याचे तात्काळ निलंबन करावे. संध्या विपुल दोषी व त्यांचे पती हे विकासकाचे भागीदार असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही दरेकरांनी केली.
वांद्रे ते मरिन ड्राइव्ह कोस्टल रोडवरून 12 मिनिटांत पोहोचणार आहोत. हा रोड बघण्यापुरता नाही, तर वेळेची 70 टक्के आणि इंधनाची 34 टक्के बचत करणारा आहे. येथील खलाशी, मच्छिमार, प्रकल्पग्रस्त यांनाही विकास होताना न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे.
मुंबईत नेहमी वेगवेगळ्या प्रकारची संकटे येतात. कधी अपघातात मुंबईकर मरण पावतो. तर कधी जाहिरातीचे फलक कोसळून. कधी पेटत्या रुग्णालयात किंवा दहशतवाद्यांच्या गोळीबारात सापडेल, याची शाश्वती नाही.
1993च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर याला आम्ही ‘स्पिरिट’ बोलतो. हे शहर आता आकार घेतेय. नाले सफाईबाबत चांगले काम उभे राहतेय. रस्त्याची कामे मोठ्या गतीने होताहेत. परंतु सातत्याने त्यांचे कंत्राट, निविदेविषयी आक्षेप घेतले जातात. जर करोडो रुपये नालेसफाई, रस्त्याच्या कामावर खर्च करणार असणार तर त्याचा लेखाजोखा मुंबईकरांसमोर आला पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.
पर्यटनावर भर देण्याची गरज..
दरेकर म्हणाले की, मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटक येतील, अशा प्रकारच्या मोठ्या गोष्टी करण्याची अत्यंत गरज आहे. नॅशनल पार्क आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित करण्याचे काम व्हावे. मुंबईला मोठ्या चौपाट्या आहेत. त्या आंतरराष्ट्रीय धर्तीवर सुशोभीत केल्या पाहिजेत. जगातून, देशातून येणारा पर्यटक चौपाट्यांवर विसावला पाहिजे. त्याचाही कृती आराखडा सरकार आणि महापालिकेने एकत्रितपणे करण्याची गरज आहे.
कोळीवाडे, कोळी परंपरा, संस्कृती मुंबईत मोठ्या प्रमाणावर आहे. छोट्या रेस्टोरंटला मोठा प्रतिसाद आहे. मुंबई ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, याची नियोजनबद्ध पद्धतीने दालने उभी केली. तर बाहेरील पर्यटकांना मुंबईत फिरता व पैसे खर्च करता येतील. त्यानिमित्ताने आर्थिक हातभार मुंबई शहराला लागेल, असेही दरेकरांनी सभागृहाला सुचविले.