आचारसंहिता लागू होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर राज्य सरकारने एका दिवसात तब्बल 259 शासन निर्णय प्रसिद्ध केले. यात अनेक वित्तीय आणि धोरणात्मक निर्णयांचा समावेश आहे. याशिवाय अनेक नियुक्त्याही केल्या आहेत. यासर्वांची तक्रार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे त्यांनी ही तक्रार केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवार, 15 ऑक्टोबर, 2024 रोजी जाहीर झाली. त्यापूर्वी हे निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
सरकारने घेतलेले अनेक निर्णय सत्ताधारी पक्षाला निवडणूक प्रक्रियेत अप्रत्यक्ष फायदा देणारे आहेत. 6 ऑक्टोबर, 2024 रोजी आणखी 30 ते 40 शासन निर्णय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेत. निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर, मध्यान्हानंतर शासन निर्णय संकेतस्थळावरून हटविण्यात आले. हा प्रकार गंभीर आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्वच निर्णय संशयास्पद असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी तक्रारीतही नमूद केले आहे.
नियुक्त्यांवर आक्षेप
महायुती सरकारने 27 महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. यातील सर्वच राजकीय आहेत. अशा सर्व नियुक्त्या राजकीय बंडखोरी रोखण्याच्या दृष्टीने करण्यात आल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. आचारसंहितेच्या नियमांनुसार त्या नियुक्त्या बेकायदेशीर आहेत, असे दानवे यांचे म्हणणे आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. आचारसंहिता लागू झाल्यानंतर घेतलेले सर्व निर्णय रद्द करावे. बेकायदेशीररित्या निर्णय घेणाऱ्या दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई, करावी, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली आहे.
अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. दिल्लीच्या वजीराने मिंधे आणि त्यांच्या गटाला ‘त्याग’ शब्दाचे महत्व सांगितले, अशी टीका त्यांनी पुन्हा केली. राज्य विधानसभा निवडणुकीत भाजप शिंदे गटाला एकेका जागेसाठी रडवेल, असा दावा त्यांनी केला. उमेदवार बदलायच्या अटी ठेवल्या जातील.
दानवे यांनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीवरून देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो आठवतोय ना? या पहाटेच्या शपथविधीची तारीख होती 23 नोव्हेंबर 2019. आता 23 नोव्हेंबर 2024 रोजीच महाराष्ट्राची जनता आणि महाविकास आघाडी यांचा निकाल लावणार आहे, असे ते म्हणाले होते.