Anything For Voting : नागपुरातील अपक्ष उमेदवारी नरेंद्र जिचकार यांच्यावर मतदारांना आमिष दाखविण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. निवडणूक पथकानं सलग दोन दिवस टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर किराणा किट जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या किराणा किटवर नरेंद्र जिचकार यांच्या नावाचा उल्लेख असल्याचं निवडणूक पथकाला आढळलं आहे.
सलग दोन दिवस ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. नरेंद्र जिचकार हे यापूर्वी नागपूर काँग्रेसमध्ये कार्यरत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि त्यांच्यातील वाद जगजाहीर आहे. वाद विकोपाला गेल्याने जिचकार यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं होते. त्यापूर्वी नागपूरच्या काँग्रेसमध्ये मोठा राडाही झाला होता. त्यानंतर जिचकार यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.
अपक्ष उमेदवारी
काँग्रेसनं पक्षातून काढल्यानंतर जिचकार यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली. विधानसभा निवडणुकीत जिचकार हे उमेदवार आहे. त्यांच्या नावानं मतदारांना किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर निवडणूक विभागाच्या पथकानं पोलिसांच्या मदतीनं छापा घातला. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पथकाने सोमवारी (11 नोव्हेंबर) ही कारवाई केली. महेश नगर येथील अमन प्राइड सोसायटीत पथकाने छापा घातला. त्यावेळी समाजभवनात मोठ्या प्रमाणावर राशन किट आढळल्या.
अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात समाजभवनात 2 हजार 500 राशन किट आढळल्या आहेत. प्रत्येक किटची किंमत 546 रुपये आढळली आहे. निवडणूक विभागाच्या पथकाने सुमारे 13 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळल्याचं नमूद केलं आहे. या किटमध्ये नरेंद्र जिचकार यांचा फोटो असलेले स्टिकरही आढळले आहेत. या स्टिकरवर त्याचं निवडणूक चिन्ह आणि वचननामा असं लिहिलेलं होतं. आता हा साठा सील करण्यात आला आहे. पथकाचे प्रमुख विक्रांत नखाते यांनी ही कारवाई केली.
विधानसभा निवडणूक काळात जिचकार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यानंतर आता त्यांच्या नावानं असलेल्या किराणा किट पकडण्यात आल्यानं जिचकार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यासंदर्भात अद्याप जिचकार यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. काँग्रेसकडून ही तक्रार करण्यात आल्याचा आरोप जिचकार यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे. मात्र किटच्या बाबत कोणीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यामुळं मतदारांना प्रलोभन दाखविल्याप्रकरणी जिचकार यांच्या विरोधात निवडणूक आयोग कोणती कारवाई करणार? याकडं आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.