देश / विदेश

AAP Vs BJP : जेपी नड्डांवर आम आदमी पार्टीचा हल्लाबोल

Atishi : भाजपच्या खात्यात मनी ट्रेल सापडल्याचा थेट आरोप

National Politics : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी तपासासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गुरुवारी रात्री अटक केली. दिल्लीतील जिल्हा न्यायालयाने केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यानंतर आपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मंत्री आतिशी यांनी भाजपच्या खात्यात मनी ट्रेल सापडल्याचा खळबळजनक आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीला त्यांनी जाहीर आव्हान दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

 

आतिशी यांनी ठामपणे सांगितले की, आजपर्यंत कोणत्याही आप नेत्याशी मनी ट्रेल जोडलेले आढळले नाही. ‘दिल्लीच्या तथाकथित अबकारी धोरण घोटाळ्यात गेल्या दोन वर्षांपासून सीबीआय आणि ईडीची चौकशी सुरू आहे. या दोन वर्षांत एक प्रश्न पुन्हा पुन्हा समोर आला आहे की, मनी ट्रेल कुठे आहे? पैसा गेला कुठे? ‘आप’च्या कोणत्याही नेत्याकडून, मंत्री किंवा कार्यकर्त्याकडून गुन्ह्याची कोणतीही रक्कम वसूल करण्यात आलेली नाही.’

 

दिल्ली मद्यधोरण प्रकरणात अटक होण्यापूर्वी शरत रेड्डी यांनी भाजपला 4.5 कोटी रुपये दिले होते. अटक झाल्यानंतर 55 कोटी रुपये दिले होते. पक्षाचे म्हणणे आहे की, शरथ रेड्डी ज्याला ईडीने मुख्य सूत्रधार बनविले होते, त्याने आधी सांगितले होते की, ते अरविंद केजरीवाल यांना ओळखत नाहीत. पण जामीन मिळताच शरथ रेड्डी यांनी बयाण फिरविले आणि ते सरकारी साक्षीदार झाले. आता त्याच शरत रेड्डी यांच्या विधानाच्या आधारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीला आव्हान देत आतिशी म्हणाले की, दारू घोटाळ्यात आता मनी ट्रेल सापडला आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना अटक करावी. सध्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीतील लोक रस्त्यावर उतरले आहेत.

 

तुरुंगातून कामकाज

 

दिल्ली दारू धोरण प्रकरणात 21 मार्च रोजी अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवत आहेत. त्यांनी रविवारी (ता. 24) जल मंत्रालयाच्या नावाने पहिला सरकारी आदेश जारी केला. दिल्लीत जिथे पाणीटंचाई आहे तिथे टँकरची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी जलमंत्री आतिशी यांना केली. यासंदर्भात आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, अबकारी धोरण प्रकरणातील सर्वांत मोठे किंगपिन शरदचंद्र रेड्डी यांच्याकडून भाजपने निवडणूक रोख्यांच्या मागे लपून सुमारे 60 कोटी रुपये घेतले. आम्ही आरोप करत नाही, आम्ही वस्तुस्थिती मांडत आहोत आणि आम्ही पुरावे दाखवले आहेत. शरदचंद्र रेड्डी यांच्या अटकेनंतर भाजपने ही 55 कोटींची देणगी घेतली.

 

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!