Umarkhed Constituency : उमरखेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळेल, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. साहेबराव कांबळे की माजी आमदार विजय खडसे यांना लॉटरी लागते, याबद्दल उत्सुकता आहे. कार्यकर्ते आणि मतदारांमध्येही याची चर्चा रंगली आहे. या दोन्ही नावांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. साहेबराव कांबळे यांच्या नावासाठी अधिकारी वर्गाची एक लॉबी चांगली सक्रिय झाली आहे.
काँग्रेसच्या निवड कमिटीमधील काही सदस्य माजी आमदार विजय खडसे यांच्या नावाचा आग्रह धरून आहेत. साहेबराव कांबळे यांनी थेट प्रदेश काँग्रेस कमिटी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमार्फत तिकीट मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. निवड कमिटीमधील बऱ्याच सदस्यांच्या तोंडून कांबळे यांच्या नावाची चर्चा होत आहे. परंतु केवळ पैशाच्या जोरोशावर कांबळे विजयी होणार नाहीत, मेसेज ग्राउंडस्तरावरून नेत्यांना पोहोचविण्यात आला आहे.
पेच कायम
उमरखेड मतदारांघात अजूनही दोन्ही नावांबाबत पेच कायम आहे. माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ,महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह निवड कमिटीमधील अनेक सदस्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. उमरखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये बाहेरचा उमेदवार चालणार नाही असे त्यांनी सांगितले. काही मोजक्या नेत्यांनी साहेबराव कांबळे यांचे नाव सुचविले. त्यामुळे विजय मिळणार नाही, हे त्यांनी पटवून दिले आहे.
साहेबराव कांबळे हे नांदेड जिल्ह्यातील आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यास मतदारसंघातील जनता स्वीकारणार नाही. माजी आमदार विजय खडसे यांच्यासाठी देवसरकर यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. खडसे यांना तिकीट नसेल तर स्थानिक उमेदवार कोणताही असो, त्यासाठी आम्ही काम करायला तयार असल्याचे नेत्यांना सांगितले आहे. विजय खडसे यांच्याकरिता दिल्लीमध्ये एक गट तळ ठोकून बसला आहे. प्रज्ञानंद खडसे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून दिल्लीमध्ये तिकिटासाठी चांगली ‘लॉबिंग’ केली आहे.
साहेबराव कांबळे यांच्यासाठी तातू देशमुख हे दिल्लीत दाखल झाले आहेत. साहेबराव कांबळे हे स्वतः मुंबईमध्ये इतर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. साहेबराव कांबळे यांचे सूत्र हॉटेल ट्रायडेंट मधून हलवले जात आहेत. याच ठिकाणी काँग्रेसचे अनेक बडे नेते मुक्कामाला आहेत. विजय खडसे हे परळमधील एका खासगी हॉटेलमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण यांच्यासोबत थांबले आहेत.
प्रकाश पाटील देवसरकर विजय खडसे रमेश चव्हाण यांनी मुंबईमधील निवड कमिटीमध्ये असलेल्या सर्व सदस्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. केवळ पैशाच्या भरोशावर बाहेरील उमेदवार निवडून येणार नाही हे पटवून दिले जात आहे. उमेदवार कोणीही असो तो स्थानिक असला पाहिजे, अशी मागणी विजय खडसे यांनी केली आहे.