Independence Day in Nagpur : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे ध्वजारोहण केले. फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस देशवासीयांसाठी महत्त्वाचा आहे. आपल्याला कल्पना आहे की, अनेक शूरवीरांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी यातना सहन करत स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले व मोठा संघर्ष उभा केला. त्या संघर्षातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. ज्यांनी हौतात्म्य पुकारले त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, असे म्हणत देशाचे रक्षण करणाऱ्या सेनेला फडणवीसांनी अभिवादन केले.
आज भारत जगातील 5 वी मोठी अर्थव्यवस्था आहे. एक थक्क करणारा प्रवास हा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या देशाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत ही थीम या स्वातंत्र्य दिनाचे ठेवली आहे. देशभरातून विविध योजनेचे 6000 लाभार्थी आज दिल्लीमध्ये स्वातंत्र्योत्सव साजरा करण्यासाठी सामली झाले. महाराष्ट्रात देखील आपण ट्रिलियन डॉलर इकॉनोमीकडे वाटचाल सुरू केली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
ट्रिलियन डॉलर इकॉनोमीकडे वाटचाल
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘देशामध्ये हाफ ट्रिलियनचा मार्क पार करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे. लवकरच आपण निश्चितपणे ट्रिलियन डॉलरकडे वाटचाल सुरू करू. याबद्दल कुठलीही शंका नाही. एक विकासाचे पर्व आपल्याला बघायला मिळत आहे.’ वैनगंगा, नळगंगा सारख्या 88 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांसह विविध प्रकल्पांच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भाचा दुष्काळ नेहमीसाठी भूतकाळ होणार. मेगा टेक्सटाईल पार्क, मेट्रो गेल्या तीन महिन्यांमध्ये पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक, अशा अनेक गोष्टी आपली विकासाकडे चाललेली वाटचाल दर्शवते, असे फडणवीस म्हणाले.
रक्कम महिलांच्या खात्यात जमा
महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी लाडकी बहीण योजना आपण आणली आहे. यासारख्या अनेक योजना हाती घेतल्या आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. 14 ऑगस्ट पासून महिलांपर्यंत योजनेची रक्कम पोहोचवायला सुरुवात केली आहे. 17 ऑगस्टपर्यंत एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Mohan Bhagwat : सरसंघचालक स्पष्टच बोलले; बांगलादेशातील हिंदूंची जबाबदारी सरकारची
तरुणी, तरुणांसाठी योजना
राज्यातील मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची सुविधा केली. वैद्यकीय, अभियांत्रिकी सारख्या 507 विविध अभ्यासक्रमांमध्ये एक पैसा देखील मुलींना लागणार नाही, असा निर्णय देखील शासनाने घेतला आहे. युवकांकरिता युवा प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत युवकांना प्रशिक्षण देण्याकरिता नोकरी दिली, तर या युवकांना 6 हजार, 8 हजार, 10 हजार रुपये स्टायफंड युवकांना देत आहोत, असे फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांना मोफत वीज
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत ज्या लोकांनी घरावर सोलर पॅनल लावले, त्या लोकांना तीनशे युनीट मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेत देशात सर्वात पुढे नागपूर जिल्हा आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
पर्यावरण रक्षणाचे कर्तव्य
नागरिक म्हणून आपण सर्वांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. मी कचरा करणार नाही, असा निर्धार जर आपण सर्व नागरिकांनी घेतला, तर पर्यावरण सुरक्षित राहील. एक वृक्ष मातेच्या नावाने असा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. प्रत्येकाने आपल्या जन्मदात्या आईच्या नावाने एक वृक्ष लावले पाहिजे. यातून निश्चितपणे वनराई तर वाढेलच. पण आईचा आशीर्वाद सुध्दा चिरंतन मिळत राहील, असे फडणवीस म्हणाले.