Congress Case : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने १२ वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आरोपी हा काँग्रेसच्या पदाधिकारी आहे. त्याच्या घरातील अनेक लोक राजकारणी आहेत. पक्षीय राजकारण बाजूला ठेवत अत्यंत गंभीर असलेल्या या प्रकरणामध्ये तातडीने कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
कोरपना येथील इमीनन्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलींच्या लैंगिक शोषणाचा हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर अनेक महिलांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भेट घेत तक्रार केली. शाळेतील मुलींना गुंगीचे औषध देण्यात येत होते. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत होता, असा आरोप महिलांनी केला आहे. घटनेतील आरोपी हा राजकीय वजन असलेल्या परिवारातील आहे. त्यामुळे तो मुंबईला पळून जात होता. त्याला स्थानिक राजकीय नेत्यांनीही मदत केल्याचा आरोप महिलांनी केला. त्यामुळे या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने बैठक घेतली. पोलिसांना नि: पक्ष आणि निष्पक्षपणे तपासाचे आदेश त्यांनी दिले
पोलिसांना आदेश
चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांना या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. या शाळेमध्ये यापूर्वीही असे प्रकार घडण्याचा आरोप महिलांचा आहे. त्यामुळे राजकीय संबंध असलेल्या इमीनन्स इंटरनॅशनल स्कूल शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी होत आहे. सोबतच शाळेतील संचालक मंडळांवरही कार्यवाही करावी.इतकेच नव्हे तर यापूर्वी आदिवासी विद्यार्थिनींच्या शोषणाचा प्रकारही घडला होता. अजूनही शाळेतील संचालक मंडळावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. महिलांनी केलेल्या या मागणी संदर्भात आपण गंभीर असल्याची ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत शाळेची मान्यता रद्द करण्याचा मुद्दा मांडण्यात येईल, असेही मुनगंटीवार म्हणाले. आरोपी सोबत आणि काही राजकीय नेत्यांचा सहभाग आहे का, याचा तपासही केला जाणार आहे. पीडित मुलींना गुंगीचे औषध देण्यासाठी आरोपी एखाद्या डॉक्टरची मदत घेत होता का, हे देखील तपासण्यात येणार आहे. याशिवाय गुंगीचे औषध कोणत्या मेडिकल दुकानातून खरेदी केले जात होते, हे देखील तपासण्यात यावे असे आदेश मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
एकालाही सोडू नका
शाळेतील विद्यार्थी जर सुरक्षित नसतील तर कोणाकडे पहावे, असा प्रश्न आता पालकांना पडला आहे. कोरपना येथील हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या एकाही आरोपीला सोडू नका, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. बालिकांवरील अत्याचाराचा प्रकार कोणत्याही राजकीय पक्षाच्या राजकारणा पलीकडचा आहे. महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर आपण अत्यंत संवेदनशील आहोत. हा तर चिमुकल्या बालिकांवर अत्याचाराचा प्रकार आहे. त्यामुळे यासंदर्भात राजकारण बाजूला ठेवत आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, अशी आपली भूमिका आहे असेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
Badlapur Case : शाळेच्या ट्रस्टींचा चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग ?
अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास करताना कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका, असे आदेश मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रकरणाचा खटला तातडीने जलद गती न्यायालयात दाखल करण्याबाबतही त्यांनी सूचना दिली. इतकेच नव्हे तर खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याबाबतही मुनगंटीवार सरकारकडे पाठपुरावा करणार आहेत.