Reaction to Action : वाहनावरील हल्ल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मनसेचे पदाधिकारी आपल्या घरावर हल्ला करणार होते. ही बाब आपल्याला माहिती झाली. त्यामुळे आपण हा हल्ला स्वत:वर घेतला, असे मिटकरी म्हणाले. मिटकरी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्यावर गंभीर आरोप केले. हल्ल्यानंतर मनसेचे पदाधिकारी शेळके यांचा भेटले. अमरावतीला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसच जर गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तर सामान्यांची काय गत असेल असा सवाल मिटकरी यांनी केला.
राज ठाकरे यांना कोणाबद्दलही बोलण्याचा हक्क मिळाला आहे का? असा सवालही त्यांनी केला. आमच्या पक्षाच्या नेत्याबद्दल बोलले तर चालते. तुमच्या साहेबांवर बोललो तर मिर्ची का झोंबली असा संतापही त्यांनी व्यक्त केला. मनसेच्या नेत्यांनी आपल्या घराला शिवतीर्थ असे नाव दिले आहे. शिवाजी महाराजांवर हे नाव आधारित आहे. शिवाजी महाराजांची कट्टर शत्रुच्याही बायकापोरांवर हल्ला केला नाही. अशात त्यांच्या नावाने राजकारण करणारे आपल्या घरावर हल्ला करण्याचा कट तयार कसे करू शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
प्रशासनाची डोकेदुखी
अमोल मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मिटकरी यांनी कर्णबाळा दुनबळे आणि अकोल्याचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचे थेट नावच घेतले आहे. सत्ताधारी आमदारावर हल्ल्याचा मुद्दा त्यांनी आता प्रतिष्ठेचा केला आहे. सत्ताधारी आमदाराला तक्रार देण्यासाठी तीन तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले जात असेल तर सामान्यांची काय गत, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे मिटकरींवरील हल्ल्याचा मुद्दा आता आणखी पेट घेण्याची चिन्हे दिसत आहेत. अशात मिटकरी यांनी एलसीबी प्रमुखांवरच आरोप केल्याचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनाही तातडीने कारवाई करावी लागणार आहे.
आम्ही कारवाईला सुरुवात केली आहे. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हल्लेखोरांचा शोधही सुरू असल्याचे अकोला पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सांगितले. मिटकरी यांच्या आंदोलनामुळे सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या परिसरात चांगलीच गर्दी झाली. त्यामुळे पोलिस स्टेशनच्या आत व बाहेरील परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. घटनेनंतर मिटकरी यांना तातडीने सुरक्षा पुरविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र त्यांनी पोलिस सुरक्षा नाकारली. आपल्याला सुरक्षा नको. परंतु हल्लेखोरांना कायद्याचा वचक बसला पाहिजे. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी मिटकरी यांनी केली.