Akola : पालकत्व घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगांना प्रत्यक्ष उपस्थित राहायचे. विकासकामांचा आढावा घ्यायचा. जिल्ह्याच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे. ही पालकमंत्र्यांची जबाबदारी असते. मात्र अकोल्याचे पालकमंत्री स्वतःच्या कोषातून बाहेर पडायला तयार नाहीत. जिल्हा नियोजन समितीची बैठक असेल अॉनलाईन उपस्थित राहून वेळ मारून नेण्याचे काम पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील करतात. त्यांच्याबद्दलचा रोष वाढत असतानाच आता त्यांनी स्वातंत्र्यदिनालाही पाठ दाखवली आहे. तिरंग्याला सलामी द्यायलाही त्यांना वेळ मिळाला नाही, त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या प्रसंगांना अनुपस्थित
जिल्हा नियोजन समितीची बैठक असेल किंवा प्रजासत्ताक दिन, स्वतंत्रदिनाचा सोहळा असेल अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे दर्शन अकोला जिल्ह्यातील जनतेला दुर्मिळ झालं आहे. त्यामुळे महायुतीच्या काळात अकोला जिल्हा पालकमंत्र्यांच्या बाबतीत दुर्दैवी ठरला आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आतापर्यंत साडेचार वर्षांच्या काळात जिल्ह्याला तीन पालकमंत्री मिळाले. हे तीन्ही पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. बच्चू कडू वगळता इतर दोन्ही पालकमंत्री अकोल्यासाठी दुर्मिळ ठरले आहेत. याही वर्षीच्या स्वतंत्र दिनाला राष्ट्रध्वजाला सलामी देण्याकरिता पालकमंत्री येणार नसल्याने निराशा झाली आहे.
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-सेनेची युती तुटल्याने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर अकोल्याचे पालकमंत्री म्हणून अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी अकोल्याचे पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. पालकमंत्री म्हणून बच्चू कडू अकोला जिल्ह्यात चांगलेच सक्रिय झाले होते. दर आठवड्यात त्यांचा जिल्ह्यात दौरा व्हायचा, त्यामुळे प्रशासनावर वचक होता. मात्र शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि महायुतीचे सरकार सत्तेवर आले.
सुरुवातीला काही काळ अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. दरम्यान त्यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा पदभार असल्याने ते अकोल्याला वेळ देऊ शकले नाहीत. दरम्यान गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नवीन मंत्रिमंडळातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. अकोल्याचे पालकमंत्री कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र अडीचशे किलोमीटरहून अधिक अंतरावर राहणारे पालकमंत्री अकोल्याला मिळाले. दुर्दैवाने ते अकोल्यापासून कायमच दूर राहिले.
अकोल्याचे पालकमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तरही बहुतांश अकोलेकरांना माहिती नसेल. कारण काही अपवाद वगळता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे दर्शन जिल्ह्यासाठी दुर्लभ झाले. किमान स्वतंत्रदिनाच्या ध्वजारोहणाला तरी पालकमंत्री येतील अशी आशा होती. मात्र यंदाही निराशाच वाट्याला आली.
कायम निराशाच केली
आता राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. महायुतीच्या काळात अकोला जिल्हा पालकमंत्र्यांच्या बाबतीत दुर्दैवी ठरला आहे. अकोला जिल्ह्याच्या नशिबी झेंडा वंदनालाही पालकमंत्री नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अकोला जिल्ह्याला डॉ. रणजित पाटील यांच्यानंतर मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. गेल्यावर्षी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अकोला जिल्ह्याला स्थान मिळेल अशी आशा होती. मात्र त्यातही निराशाच झाली. तर दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकाळात तर जिल्ह्याला पालकमंत्री आहेत की नाही, असाच प्रश्न अनेकांना पडला.
सपशेल अपयशी
पालकमंत्री हे जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेते असतात. त्यामुळे त्यांची भूमिका जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाते. तर जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताधारी पक्षाची ताकद कशी वाढेल यादृष्टीने राजकीय भूमिका पालकमंत्री घेत असतात. मात्र ही जबाबदारी पार पाडण्यातही ते मागे पडले आहेत. यानंतर राज्यात कुणाचेही सरकार आले तरीही जिल्ह्याकडे लक्ष देणारा पालकमंत्री मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.