महाराष्ट्र

Akola : जनासाठी अथवा मनासाठी का होईना विखे पाटील आले

Radhakrishna Vikhe Patil : पालकमंत्री पदाबाबत अकोल्याचे दुर्दैव संपावे

Mahayuti & Mahavikas Aghadi : पश्चिम विदर्भात महत्वाचे शहर म्हणून ओळख असली तरी विकासाच्या बाबतीत अकोला कमनशिबीच आहे. धरण उशाला पण कोरड घशाला हे अकोल्याचे नेहमीचे दुखणे आहे. अनेक दिवस कोरड्या पडणाऱ्या नळांमुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही अकोलेकरांचे डोळे आजही पाणावतात. रस्ते, उद्योग, शिक्षण, रोजगाराच्या संधी याबाबत आजही अकोला मागासच आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणून पालकमंत्री पदाबाबतही अकोल्याचे नशीब फुटकेच आहे. महाविकास आघाडी असो की महायुती सगळ्यांनीच अकोलेकरांच्या जखमेवर नेहमीच मीठ चोळले आहे. अकोल्याला गेल्या अनेक वर्षांपासून पोरके ठेवणारे पालकमंत्री देऊन.

महाविकास आघाडीची सत्ता असताना बच्चू कडू हे पालकमंत्री होते. जोपर्यंत त्यांना प्रसारमाध्यमांनी रकानेच्या रकाने लिहून झोडून काढले नाही, तोपर्यंत काही ते अकोल्यात आले नाही. बच्चू कडू यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकले आहे, ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी. अपवाद वेगळता विखे पाटील यांच्यासाठी अकोला सावत्र मुलगाच ठरला. एखादी आई सावत्र मुलाला तुझ्या बापाचेही तुझ्यावर सख्ख्या मुलासारखे प्रेम आहे, हे समजावीत राहते. अगदी त्याच पद्धतीने अकोल्यातील भाजप लोकांना विखे पाटील अकोल्यासाठी किती रक्ताचे पाणी करत आहेत, हे पटवून देत होते. पाटील यांना अकोल्यासाठी वेळ नव्हता हे लक्षात येत होते. पण 15 ऑगस्टला राष्ट्रध्वजाला सलामी देण्यापुरतेही ते आले नाही. अकोल्याचा ठिक पण राष्ट्रीय उत्सवाचेही इतके काय वावडे?

निवडणूक आली म्हणून

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट अकोल्यात खूपच आक्रमक आहे. शिवसेना सतत भाजपला कोंडीत पकडते. मलमत्ता कर, उड्डाणपूल, अंडरपास, गांधीग्रामचा पूल, पीकविमा यावरून शिवसेना आक्रमक झाली. त्यांनी उग्र आंदोलन केले. त्यानंतर शिवसेना वळली ‘मिस्टर इंडिया’ झालेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाचा प्रसंग वगळला तर विखे पाटील जनहितासाठी स्वतःहून अकोल्यात मनापासून आल्याचे आठवत नाही. अशात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली.

Radhakrishna Vikhe Patil : अखेर पालकमंत्र्यांना सापडला मुहूर्त!

बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी विखे पाटील यांना आणण्यासाठी जाण्याची घोषणा केली. शिवसेनेने हे आंदोलनाची घोषणा करताच पालकमंत्र्यांचा दौरा धडकला. निष्पक्ष आणि नि:पक्षपणे विचार केला, तर हे शिवसेनेचे यश आहे. पण भाजपसाठी पुन्हा चिंतेचा विषय आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप गरजेपेक्षा जास्त ‘ओव्हर कॉन्फिडन्स’मध्ये होती. विकास नाही केला तरी चालते, असे भाजपला वाटत होते. ‘मोदी हैं तो मुमकिन हैं..’ यावरच भाजप अवलंबून होती. त्यामुळे भाजपला तोंडघशी पडावे लागले. विदर्भात तर पानिपतच झाले. लोकसभा निवडणुकीत तयार झालेला ट्रेंड अजूनही कायम आहे. विधानसभा निवडणूक समोर आहे. त्यामुळे भाजपला राधाकृष्ण विखे पाटील यांना अकोल्यात पाठवण्याशिवाय पर्याय नव्हता.

आले की पाठवले?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अपप्रचार केला असे सत्ताधारी सांगतात. पण मतदारांमध्ये अनेक जण उच्च शिक्षित आहेत हे कसे विसरता येईल. मतदार सगळे पाहत असतात. त्यांना सगळे कळत असते. ‘ये पब्लिक हैं, ये सब जानती हैं..’ या गीताचे बोल काही गीतकारला उगाच सुचले नसावे, हे सर्वच राजकीय पक्षांनी जाणून घ्यावे. त्यामुळे शिवसेनेने आंदोलनाची घोषणा करताच विखे पाटील यांचा दौरा निश्चित होणे हा योगायोग वाटत नाही. त्यामुळे जनासाठी अथवा मनासाठी का होईना राधाकृष्ण विखे पाटील अकोल्याकडे वळल्याचे सध्या तरी दिसत आहे. पण यातून महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही धडा घ्यावा. मतदारांना गृहीत धरणे बंद करावे. विकासासाठी आग्रही राहावे. असे केले नाही तर कितीही ध्रुवीकरण केले तरी ‘पब्लिक सब जानती हैं..’ हे ध्यानात ठेवावे. शेवटी एकच मंत्र, एकच नारा सत्य आहे, ‘विकास केला, तरच सगळे मुमकिन आहे.

error: Content is protected !!