Collector Ajit Kumhar: अकोला, खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपल्याने शेतकरी सध्या पेरणीच्या तयारीत व्यस्त आहे. तर दुसरीकडे राज्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कुठेही कृषी निविष्ठांचा काळा बाजार होऊ नये यासाठी पथकांची काटेकोर तपासणी आणि अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. मात्र यानंतरही अकोला जिल्ह्यात बियाणांचा काळाबाजार सुरूच असल्याचे चित्र आहे. नुकतीच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जादा दरात शेतकऱ्यांना बियाणे विकणाऱ्या अकोला शहरातील एका कृषी केंद्रावर कारवाई केली. मात्र सध्या बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. पेरणीसाठी शेतीही तयार झाली आहे. मात्र पावसाच्या प्रतिक्षेने पेरण्या खोळंबल्या. त्यामुळे आर्थिक जुळवाजुळव करून सध्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध करून देण्यासह बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अकोला जिल्हाधिकारी यांनीही कृषी निविष्ठा, खते, बियाणे यांच्या वितरणाबाबत बैठक बोलावून कृषी निविष्ठांचा कुठेही काळा बाजार होऊ नये यासाठी पथक गठीत केले. पथकांनी काटेकोर तपासण्या व कुठेही अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र असे असतानाही खरीपाच्या तोंडावर अकोला जिल्ह्यात बियाणांचा काळाबाजार सुरूच असल्याचे चित्र आहे.
एकीकडे प्रशासकीय यंत्रणा बोगस बियाणांचा काळाबाजार प्रकरणी सतर्क झाली असताना अकोला शहरासह जिल्ह्यात कापसाच्या बियाणांची अव्वाच्यासव्वा दरात विक्री होत आहे. त्यामुळे बियाणांचा काळाबाजार रोखण्याचे पोलीस आणि कृषी विभागापुढे मोठे आव्हान आहे.
शेतकरी वर्गाकडून बी-बियाणे, रासायनिक खते घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. परंतू बहुतांश कृषी केंद्रांतून मागणी असलेले कपाशी वाण तुटवड्याचे कारण दाखवून जादा भावाने विकले जात आहे. 864 रुपयांची बॅग 1300 ते 1500 रुपयांपर्यंत विक्री होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना बिल मात्र 864 रुपयांचे दिले जात असल्याचे चित्र आहे. या प्रकारात कृषी अधिकाऱ्यांची डोळझाकपणाची भूमिका आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एमआरपी पेक्षा जास्त आकारणी
कपाशी बियाण्यांच्या पॉकिटवर 864 रुपये एमआरपी असलेल्या कापसाच्या बिजी 2 बियाण्यांची 1100 रुपये दराने विक्री होत असल्याच्या माहितीवरून अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे अकोल्यातील राजस कृषी केंद्रावर धाड टाकली. जादा दरात विक्री करणाऱ्या सुबोधेश्वर शेगोकार नामक कृषी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 98 हजार रुपयांच्या बियाण्यांच्या बॅग कृषी विभागाने जप्त केल्या. गेल्या काही दिवसापासून पसंतीची कपाशी बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. काही ठिकाणी बियाण्यांचा गोरखधंदा पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वीही कृषी विभागाने कारवाई केली. मात्र ही मोहीम सध्या व्यापक होण्याची आवश्यकता आहे.
कृषी विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
कपाशीचे तुलसी कंपनीचे कबड्डी, पंगा, अजित 155, अजित 05, ऍग्रिसिड 7076, राशी सिड्स 659, राशी सिड्स 779, स्विफ्ट, प्रवर्धन सीडलेस एक्स, प्रवर्धन रेवंत या सर्व बियाणांचा कृत्रिम तुटवडा भासविण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असून, शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.