Communal Tension : पश्चिम विदर्भातील अत्यंत महत्त्वाचे शहर असलेले अकोला पुन्हा एकदा दंगलींचे गाव ही ओळख पुनर्स्थापित करीत आहे. 1992-93 नंतर पश्चिम विदर्भातील अनेक गावांची हिच ओळख होती. मोठमोठे आयपीएस, आयएएस अधिकारी या गावांमध्ये नियुक्ती घेत नव्हते. अकोला, खामगाव, मलकापूर, अंजनगावसुर्जी, अकोट, पथ्रोट, दर्यापूर, बाळापूर असा हा दंगलींचा पट्टाच तयार झाला होता. अकोल्याच्या इतिहासात 1992-93 नंतर सर्वांत मोठी दंगल झाली 2002 मध्ये. 30 मार्च 2002 हा तो दिवस. अकोल्यात त्या दिवशी धुलिवंदनाचा उत्सव सुरू होता. पण समाजकंटकांनी या रंगात भंग टाकला. आजही प्रशासनाच्या दप्तरी या दंगलीची नोंद ‘भीषण दंगल’ अशीच आहे.
देवेन भारती (IPS Deven Bharti) ते त्यावेळी अकोल्याचे पोलिस अधीक्षक होते. अनुप कुमार जिल्हाधिकारी होते. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या टीममध्ये असलेले राम जोशी अकोल्याचे तहसीलदार आणि पुण्यात कार्यरत असलेले प्रवीण देवरे त्यावेळी उपविभागीय अधिकारी (SDO) होते. शहराचे पोलिस उपअधीक्षक प्रतापसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक विनोद इंगोले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण धोटे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक जिवाजीराव जाधव अशी अधिकाऱ्यांची फळी होती. चतरसिंग इंगळे हे त्यावेळच्या प्रचंड संवेदनशील जुने शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक होते. दंगलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यावेळी पोलिसांनी मोठा गोळीबार केला होता. जिवाजीराव जाधव यांनी सोमवारी (ता. 7) ज्या भागात दंगल झाली, त्याच भागात गोळीबार केला होता. अनेक दिवसांपर्यंत या दंगलीची धग कायम होती. अनेक दिवसांपर्यंत संचारबंदी कायम होती. संचारबंदी हटल्यानंतरही पोलिस आणि प्रशासनाच्या कारवाईची दहशत समाजकंटकांमध्ये होती. त्यानंतर अकोला शांत झाले.
धगधगता ज्वालामुखी
धगधगता ज्वालामुखी जसा शांत होतो, तेसे दंगलीचे गाव अकोला शांत झाले. त्यानंतर एकही मोठी दंगल अकोल्यात घडली नाही. परंतु कोविडच्या (Covid) महासाथीनंतर अकोल्यातील तंत्र बिघडत गेले. अकोला पोलिस दलातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी माफियांशी हातमिळवणीच केली. लोकांनी तक्रार केलीच तर पोलिसांना डबा पोहोचण्यापूर्वीच उपद्रवखोरांना फोन जाणे सुरू झाले. तक्रार कोणी केली, त्याचे नाव, फोन नंबर, पत्ता सगळेच सांगितले जाऊ लागले. त्यामुळे अकोल्याच्या पोलिस दलातील ताळतंत्रच बिघडत गेले. पोलिसांशी हातमिळवणी करणाऱ्यांमध्ये अनेकांचा समावेश आहे. यातील काही भूमाफिया आहेत. मोक्याच्या मालमत्ता कमी दरात खरेदी करणारे हे ‘सिंडिकेट’ आहे. त्यांना मालमत्ता खरेदी करण्यासाठी प्रसंगी ‘फॉरेन फंडिंग’ होते. महापालिकेतूनही यांचे प्लान सहज मंजूर होतात. काही पेट्रोल-डिझेल माफिया आहेत.
वरली, जुगार, मटका चालविणारेही पोलिसांचे कोविडनंतर जवळचे मित्र झालेत. ‘लिव्हिंग वीथ कोविड’ सारखीच पोलिसांना ‘लिव्हिंग अॅन्ड अॅडजेस्टिंग वीथ क्रिमिनल’ अशी सवय पडली. त्यामुळे तक्रार करणाऱ्यांची माहिती गावगुंडांना घरबसल्या मिळण्यास सुरुवात झाली. गायगाव ते बस स्थानक चौक अशी इंधन तस्करी करणारे ऑटो चालकही आहेत. लोकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आधीचा 100 आणि आताचा 112 हा नंबर डायल करणे बंदच केले. यातील काही वेगवेगळ्या नेत्यांचे चट्टेबट्टे आहेत. काहींनी स्वत: राजकीय पक्षाचे झेंडे, छाप्या हाती, गळ्यात घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षेचे कवचच मिळाले आहे. हे कवच दानशूर कर्णाच्या कवचापेक्षाही अभेद्य आहे. त्यामुळे अकोल्यात एकेकारी भिकारी अवस्थेत तुटकी चप्पल घालून फिरणारे आलीशान बिल्डिंग उभारू लागले. हे कसे शक्य झाले. त्यांच्या बहुमजली इमारत, अपार्टमेंट कसे उभे झाले. ते आलीशान धार्मिक कार्यक्रम कसे घेऊ लागले. आलीशान धर्मस्थळ कसे उभे करू लागले, याकडे दुर्लक्ष करणं सुरू झालं. कदाचित हे दुर्लक्ष जाणीवपूर्वक असंच आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
यंत्रणा कुचकामी
अकोल्यात या कामांसाठी पैशांचा समुद्र वाहात आहे. मात्र नेत्यांच्या मागे पळणाऱ्या ईडी, सीबीआय, आयकर विभागाला हे काहीच दिसले नाही. याची तक्रारही कधी झाली नाही. त्यामुळे भूमाफियांच्या ‘सिंडिकेट’ला किती पैसा येतो, कुठून येतो याचा हिशोबच नाही. त्यामुळे सरकार काळ्या पैशावर ‘वॉच’ असल्याच्या निव्वळ डिंगा मारते, असेच म्हणता येईल. केवळ अकोल्यातच नव्हे तर प्रकार संपूर्ण राज्यभर, देशभर हेच सुरू आहे. याचाच फायदा कोविडनंतर अशा लोकांनी घेतला ज्यांना आपली पोळी शेकायची होती.
कोविडनंतर अकोल्यातील परिस्थिती टप्प्याटप्प्याने बिघडत गेली. माफिया आणि पोलिसांची इतकी जवळीक झाली की, ते एसपी, कलेक्टरची विकेट घेण्याचीही ताकद ठेऊ लागले. अशातच अकोल्यात 2002 नंतर शांत झालेला जातीयवादाचा ज्वालामुखी पुन्हा धगधगण्यास सुरुवात झाली. त्याचे हादरे जाणवत होते. तब्बल 21 वर्षांनंतर मे 2023 मध्ये अकोल्याच्या जुने शहर याच भागात पुन्हा दंगलीच्या ज्वालामुखीचा स्फोट झाला. यात एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला. संदीप घुगे हे त्यावेळी (2023) पोलिस अधीक्षक होते. तेव्हापासून आता हा जातींमधील द्वेष वाढत आहे.
Akola Tension : ऑटो, दुचाकीच्या धक्क्याच्या क्षुल्लक कारणावरून दंगल
आधीपेक्षाही धोका
आता अकोल्यातील हा जातीय द्वेष राहुनराहुन आपला ‘लाव्हा’ बाहेर ओकत आहे. हा ‘लाव्हा’ आता 1992-93 आणि 2002 पेक्षाही जास्त भयंकर रूप घेत आहे. अगदी एकमेकांचे जीव घेण्यासाठी जंगलेल्या तलावारींना पुन्हा धार लावली जात आहे. अनेक राजकीय नेते या ज्वालामुखीत घासलेट टाकण्याचे काम करीत आहेत. यात काही इकडचे आहेत, काही तिकडचे. मात्र या सगळ्यात नुकसान होत आहे, ते सामान्य अकोलेकराचे.
दंगलीचे गाव म्हणून अकोल्यात अधिकारी येत नव्हते. अगदी तसेच उद्योगही या गावाकडे पाठ फिरवायचे. त्यामुळेच अकोल्याच्या एमआयडीसीत एकही मोठा उद्योग झाला नाही. पश्चिम विदर्भातील अकोला हे मध्यवर्ती केंद्र आहे. पण नामांकित शिक्षणसंस्था याच दंगलीच्या कलंकामुळे अकोल्यात येत नव्हत्या. आजही येत नाहीत. अकोल्यात राहून काय दंगलखोर बनायचे आहे का? असा प्रश्न करीत लोक आपापल्या मुलांना मुंबईपुण्याला पाठवून द्यायचे. दंगली झाली की मिळेल त्या किमतीत मालमत्ता विकून लोक अकोला सोडून दुसऱ्या शहरांमध्ये निघून जायचे.
हा कलंक आता 2002 मध्ये अकोल्यात कार्यरत प्रशासकीय अधिकारी आणि त्यावेळच्या नेत्यांनी पुसून टाकला होता. पण हा कलंक पुन्हा अकोल्यावर लागला आहे. हाच संताप भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी मे 2023 मध्ये दंगल झाल्यानंतर व्यक्त केला. आमदार शर्मा कॅन्सरने ग्रस्त होते. त्यांना धड चालताही येत नव्हते. परंतु मे 2023 मध्ये दंगल झाल्यानंतर ते जुने शहर पोलिस ठाण्यात आलेत. शांतता समितीच्या बैठकीत अनेक नेते चमकोगिरी करीत होते. पण आमदार शर्मा यांचा संताप दिसला. हा संताप पोटतिडकीतून होता.
शेवटचा संताप
जुने शहर पोलिस ठाण्यात आमदार गोवर्धन शर्मा ऊर्फ लालाजी दंगलीनंतर तेव्हाचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्यावर संतापले. कॅन्सरच्या दाहापेक्षा दंगलीच्या वेदना त्यांच्यासाठी असह्य होत होत्या. दंगलीचे गाव म्हणून अकोल्यावर कलंक होता. तो कलंक अधिकारी, नेत्यांनी पुसून टाकला होता. पण तुमच्या सगळ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा कलंक पुन्हा लागणार आहे, असा लालाजींचा स्वर चढला. त्यावेळी लालाजी थरथरत होते. पण त्यांचा संताप भविष्यातील संभाव्य अग्नितांडवाचे संकेत देणारा होता.
लालाजींचा हा संताप अखेरचा ठरला. त्यानंतर त्यांचे निधन झाले. पण त्यांनी व्यक्त केलेली भीती आता खरी ठरत आहे. दंगलींचे गाव अकोला, ही पुसलेली ओळख आता अकोल्याच्या बाबतीत पुन्हा जैसे थे होत आहे. आधीपेक्षाही आक्राळविक्राळ रुपात. यातून अनेक घरं जळू शकतात. अनेकांचे जीव जाऊ शकतात. अनेकांचे रोजगार हिरावू शकतात. पण याचे कोणालाही काहीही देणेघेणे नाही.
अकोल्यात अनेक अधिकारी आलेत आणि बदलीनंतर निघून गेले. आजही हा क्रम सुरू आहे. भविष्यातही अधिकाऱ्यांबाबत हा बदल होणार नाही. त्यांना एका शहराचे प्रेम कधीच नसते. त्यांना तसे प्रशिक्षणच असते. असे अधिकारी कोणत्याही प्रेमात अडकून पडत नाहीत. पण हे गाव माझं आहे. या गावात माझंही घर आहे. आज जी आग लावली जात आहे, ती माझ्याही घरापर्यंत येऊ शकते. आज जो दगड, तलवार, शस्त्र वापरला जात आहे, तो माझ्याही कुंटुंबावर, मुलाबाळांवर चालू शकतो, याचा काहींना विसर पडलेला दिसत आहे.
सबको सब पता है
अकोल्यात दंगल घडविणारे कोण, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण सरकारी यंत्रणा मूग गिळून बसली आहे. दंगलखोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यात सरकारी यंत्रणाही दुर्लक्ष करीत आहे. अशा समाजकंटांचे नाव, पत्ते, फोन नंबर, फोटो अशी सगळी कुंडली पोलिसांकडे आहे. त्यांचे अनेक फुटेजही आहेत. पण त्यांच्यावर कारवाई मात्र झालेली नाही. काही नेते तर अगदीच दोगले आहेत. त्यांच्याच काळात अकोल्यात ‘टिपू सुलतान’चा उदय झाला. त्यांच्याच काळात विटंबनेच्या घटना घडल्या. त्याच्यापैकीच अनेक जण या भूमाफियांचे पार्टनर आहेत. तस्कारांचे पार्टनर आहेत. कागदोपत्री त्यांची नावे नसली तरी ते या महापापाचे भागिदार आहेत.
अशा महापापी लोकांना नियती कधी माफ करीत नसते. असे म्हटले जाते की निसर्ग केलेल्या कर्माचे, पापाचे फळ देतोच. त्यामुळे अकोल्याला 21 वर्षांनंतर त्याच दंगलीच्या ज्वाळांमध्ये लोटणाऱ्यांना शिक्षा गरजेची आहे. ती कायद्याने शक्य नसली तर निसर्गाकडून मागून घेणे शक्य आहे. असे म्हणतात की, ‘उपरवाले की लाठी मे आवाज नही होती.’ याच लाठीचा आता लोकांनी वापर करावा. सध्या आदिशक्तीचा उत्सव नवरात्र सुरू आहे. त्यामुळे अकोलेकरांनी देवीला एकच प्रार्थना करावी, दोन दशकांनंतर पुन्हा एकदा अकोला पेटविणाऱ्या सगळ्या दैत्य, असुरांचा नाश कर. मग ते दैत्य, असूर इकडचे असो किंवा तिकडचे. एक अकोलेकर इतके तर नक्कीच करू शकतो.