संपादकीय

NCP Vs NCP : दादांची चुकीची कबुली, ताईंचे रामकृष्णहरी

Ajit Pawar : राजकीय वाटेवरील आव्हानांची मालिका अद्यापही कायम

या लेखात प्रकाशित मतं ही लेखकांची आहे. द लोकहित या मतांशी सहमत असेलच असे नाही

Power Play Of Pawar : अजितदादा पवार हे महाराष्ट्रातील राजकारणात जम बसवलेले व्यक्तिमत्त्व. आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःच्या खास शैलीने जनमानसांच्या मनात त्यांनी आपले‌ नाव कोरले आहे. एकाच पक्षात राहत त्यांनी आपली पक्षनिष्ठा सिद्ध केली. आताही त्यांनी पक्ष सोडलेला नाही. त्याच पक्षाचा एक गट घेऊन ते बाहेर पडले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते संस्थापक अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे पाठबळ मात्र त्यांचे जवळ आता नाही.

दादा आपला गट घेऊन भाजपसोबत गेले. ते अद्यापही अनेकांना रुचलेले नाही. त्यामुळे दादांसोबत आमदारांचा गोतावळा असला, तरी जनप्रवाह मात्र मोठ्या साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. आपल्या गटाला प्रभावी पक्ष म्हणून जनतेत रुजविण्यात अजुनही दादांना यश मिळालेले नाही. या भांबावलेल्या स्थितीत काही चुकीचे निर्णय त्यांच्या हातून घेतले जात असल्याचे दिसते. काही निर्णयाच्या बाबतीत त्यांना पश्चात्ताप होत आहे. मनातील खंत ते आता मनमोकळेपणाने बोलून दाखवित आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत गटबाजी झाली. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने भाजपसोबत मैत्री साधली. एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली.

गिरविला तोच कित्ता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी शिंदे यांचा कित्ता गिरवला. 40 आमदार घेऊन दादा महायुतीत सहभागी झालेत. अर्थमंत्री पदासोबत उपमुख्यमंत्रिपदही त्यांना मिळाले. त्यांनी उचललेले हे पाऊल मात्र जोखीमीचे ठरत आहे. स्वतःच्या पक्षाला उभारी देण्यात दादांना फारसे यश मिळालेले दिसत नाही. लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत तर त्यांच्या पक्षांची कामगिरी सुमार राहिली. राजकारणाच्या झपाटलेल्या कालखंडात त्यांनी कुठलाही विचार न करता बहिणीच्या विरोधात स्वतःच्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरविले. कुटुंबाचा रोषही ओढवून घेतला. अजून नात्यातील संबंध पूर्ववत झालेले नाहीत. कटुता कायम आहे.अशातच अलीकडेच अजितदादांनी मनातील खंत शब्दात व्यक्त केली.

Ajit Pawar : महायुतीचेच सरकार येईल, योजनाही सुरू राहील

दादांना आपली चूक उमगली

लोकसभा निवडणुकीदरम्यान अजितदादा व सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यात कमालीची कटूता निर्माण झाल्याचे दिसले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषणातून ती कटुता महाराष्ट्रातील जनतेलाही जाणवली. निवडणुकीचा निकाल केव्हाच लागला आहे. बरेच पाणी आता वाहून गेले आहेत. अशात आता दादांना आपली चूक उमगली आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे ही चूक झाली, तसे करायला नको होते, असे दादा म्हणाले. घरात लाडक्या बहिणी आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, राजकारण घरात शिरू द्यायचे नसते. पण माझ्याकडून ते झाले. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते. बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत.

राजकारण घरात येऊ देऊ नये

माझ्याकडून मागे थोडीशी चूक झाली. त्याकाळात मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते. त्यावेळेस ते केले गेले. आता जे झाले ते झाले. एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. पण आज माझे मन मला सांगत आहे की, तसे व्हायला नको होते. रक्षाबंधनाला मी तिकडे असेल तर मी राखी बांधून घ्यायला बहिणीकडे जरूर जाईन, असेही अजित पवार म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातच मुख्य लढत झाली. या लढतीत सुप्रियांनी सुनेत्रांचा दीड लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. अजितदादांसाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरण्यासाठी नंतर सुनेत्रा वहिनींची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली.

Eknath Shinde : दीड नव्हे तीन हजार बहिणीच्या खात्यात जमा

दादांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरि असे म्हणून बोलणे टाळले. नंतर एका भाषणात त्यांनी दादांनी पक्ष आणि चिन्ह मागितले असते तरी दिले असते असे वक्तव्य केले. सोबत कुणी काही गाठोडे बांधून नेऊ शकत नाही. हे सांगायला त्या विसरल्या नाहीत.

चुकीचे निर्णय 

राजकारणात प्रमुख राजकीय नेत्यांकडून काही वेळेस चुकीचे निर्णय घेतले जातात. परिस्थितीचा योग्य वेध घेता न आल्याने अशा चुका होतात. नंतर ‘अब पछतायें होत क्या जब चिडीयां चुग गयी खेत’ अशी स्थिती निर्माण होते. अजितदादांच्या बाबतीतही नेमके हेच घडत आहे. आज ते सत्तेत जरूर आहेत, पण पुढे काय होईल याबाबतची साशंकता त्यांच्या मनात कायम आहे. महायुतीत त्यांच्या पक्षाबाबत आजपर्यंत बरेच संभ्रम पसरविण्याचे प्रयत्न झालेत. यापुढे त्यांच्या पक्षाला कितपत मान आणि स्थान मिळेल, यावर बरेच काही अवलंबून आहे. एकंदरीत दादा सध्या द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. प्रश्न केवळ पक्षाचाच नव्हे, तर त्यांच्या राजकीय अस्तित्वाचाही आहे. अजितदादांसमोर नवनवीन आव्हानांची मालिका त्या मुळे कायम आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!