Jansanman Yatra : आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही. लोकोपयोगी विकासकामे करण्यासाठी आम्ही सत्तेत सामील झालो. आज मी जे काही करत आहे ते सत्तेत नसतो तर करु शकलो नसतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून त्यांनी दिंडोरी येथून निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
आज मी सत्तेत आहे म्हणून तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना आणू शकलो. शेतकऱ्यांची वीज माफी करू शकलो. आता महिलांना तीन सिलेंडर मोहत देत आहोत. हे मी सत्तेत आहे म्हणून करु शकतोय. आमची प्रशासनावर पकड आहे. त्यामुळे ही कामे होत आहेत, असेही ते म्हणाले.
सर्व जातीधर्माचे हे सरकार आहे. चांगल्या योजना तुमच्यासाठी आणल्या आहेत. खोट्या-नाटया अफवांना बळी पडू नका. जे लोकसभेत झाले ते विसरुन जा. आणि विधानसभेमध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी आशिर्वाद द्या, अशी हाक अजित पवार यांनी उपस्थित महिलांना दिली.
१७ ऑगस्टपर्यंत बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. कालच कॅबिनेट बैठकीनंतर ६ हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आज इथे आलोय. हा चुनावी जुमला नाही. तुम्ही साथ द्या ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे हा अजितदादाचा वादा आहे, असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.
बहिणींनो घाबरू नका
अजूनही महिलांचे सबलीकरण करण्याची गरज आहे. राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मान – सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही अर्ज भरले जात आहेत. घाबरु नका तुम्हाला योजनेचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत हा अजितदादा तुमच्या पाठीशी उभा आहे असा शब्दही अजित पवार यांनी महिलांना दिला.
अनेक उन्हाळे-पावसाळे बघितले
३३ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक उन्हाळे-पावसाळे बघितले आहेत. शेतकऱ्यांना मदत केली आहे. माझ्या शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जावं लागत होतं. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय घेतला आणि शून्य टक्के व्याजाने कर्ज द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आजही शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला.
पैसे मागायला आला तर माझं नाव सांगा
हे राज्य सरकार तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी खर्च करायचा नाही तर कुणासाठी खर्च करायचा? सर्व मुलींना मोफत शिक्षण देणार आहे. वर्षाला तीन सिलींडर मोफत दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बील माफ केले आहे. मागचे पण आणि पुढचेही वीज बिल भरायचे नाहीय. वायरमन विचारायला आला तर त्याला माझं नाव सांगा, या शब्दांत त्यांनी आश्वस्त केले.