Assembly Election : अर्थमंत्री पदाचा आपल्याला प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. आपणही अर्थमंत्री म्हणून विदर्भासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. विदर्भाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही निधीचा ओघ कमी पडणार नाही. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. काटोल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित सन्मान यात्रेत ते बोलत होते.
काटोल आणि नरखेडचा विकास खोळंबला आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर या भागातील विकासाला चालना देण्यात आली आहे. काटोल आणि नरखेड हा परिसर संत्रा उत्पादक भाग आहे. या भागात कापसाचे पिकही मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यामुळे या भागात सूतगिरणी असावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. महायुतीची सत्ता आल्यास सूतगिरणी आणि संत्रा प्रकल्पावरील उद्योगाच्या बाबतीत लोकांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
विदर्भ विकासावर भर
विदर्भाचा झपाट्याने विकास होत आहे. सरकार महाराष्ट्राचा समतोल विकास साधण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सरकार म्हणून विदर्भाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण येथे प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांचा वेगाने विकास होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चित्र वेगाने बदलत आहे. त्यामुळे या भागात शिक्षण, रोजगार आणि दळणवळणाऱ्या साधनांमध्ये वाढच होत असल्याचे अजित पवार म्हणाले.
विकासाच्या अनेक योजना महायुती सरकारजवळ तयार आहेत. अशात महिलांच्या आर्थिक आणि शैक्षणिक विकासावर भर देण्यात येणाार आहे. काटोल, नरखेडसह विदर्भातील पोलिसांना सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देणार असल्याची ग्वाही देखील अजित पवार यांनी दिली. आगामी काळात या संपूर्ण प्रदेशाचे चित्र बदलेले असेल. त्यामुळे विकासाच्या बाबतीत काटोल, नरखेडसह विदर्भातील जनतेचे निश्चिंत राहावे, असा शब्द अजित पवार यांनी दिला. विदर्भातील पुर्वीची स्थिती आणि आताची परिस्थिती यात व्यापक बदल झाल्याचेही दादा म्हणाले. विकासाचे काम करताना पक्षीय राजकारण बाजूला ठेवत महायुती एकदिलाने काम करीत आहे. त्यामुळे विकास हवा असेल, तर महायुती शिवाय पर्याय नसल्याचेही पवार म्हणाले.