Mahayuti : जागावाटप, उमेदवारी, मंत्रिमंडळ आणि खातेवाटप अशा चार भागांमध्ये रंगलेले नाराजी नाट्य आता एका नव्या टप्प्यात येऊन पोहोचले आहे. सध्या खातेवाटपावरून महायुतीमध्ये अंतर्गत खडाजंगी सुरू असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार गायब झाले आहेत. महायुतीमधील नेते अजितदादांना फोन करत आहेत. मात्र त्यांचा फोन नॉट रिचेबल येतोय. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कमालीचे अस्वस्थ आहेत.
मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी आटोपला. त्यानंतर अजितदादा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित नव्हते. रविवारी संध्याकाळी माध्यमांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांवर अजितदादांनी हसतखेळत उत्तरं दिली. पण, त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आणि मंगळवारी दुसऱ्या दिवशीही ते सभागृहात नव्हते. गेल्या चोवीस तासांपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल येतोय. त्यामुळे मंगळवारी राज्यपालांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला फक्त मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेच उपस्थित होते. अजितदादा तिथेही उपस्थित नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
रोष व्यक्त
भाजपमधील दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डावलल्याबद्दल फडणवीस यांच्याबद्दल रोष व्यक्त होत आहे. तर राष्ट्रवादीमधील भुजबळ, वळसे-पाटील यांच्यासारख्या नेत्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवल्याबद्दल अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला जात आहे. भुजबळांनी तर अजित पवार यांच्याशी चर्चा करण्याची गरज नसल्याचेही बोलून दाखवले आहे. विशेष म्हणजे ‘मी काही तुमच्या हातातील खेळणं नाही’ अशा कठोर शब्दांत भुजबळांनी अजित पवारांना सुनावले आहे. या एकूण परिस्थितीत अजितदादांचे नॉट रिचेबल होणे कोणत्या नव्या समीकरणाचे संकेत आहेत, असेही बोलले जात आहे.
अजित पवार घरीच होते!
अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर ‘नॉट अव्हेलेबल’ असा बोर्ड लावण्यात आला होता. पण सोमवारी ते बंगल्यावरच होते, असा दावा शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत बोलताना केला. भुजबळ यांच्यापुढे येण्याची हिंमत नसल्याने अजितदादांनी हा निर्णय घेतल्याची कोटीही त्यांनी केली.
अजितदादा दिल्लीत?
आधी जागावाटप, नंतर मंत्रिपदासाठी अजित पवार यांना वारंवार दिल्ली गाठावे लागले होते. आता खातेवाटपाच्या मुद्यावरूनही अजित पवार थेट दिल्लीत पोहोचले आहेत, अशी चर्चा आहे. अजित पवार यांनी फडणवीस आणि शिंदेंशी चर्चा न करता दिल्ली गाठली असेल तर खातेवाटपात मोठे बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अधिवेशन संपण्यापूर्वी खातेवाटप जाहीर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण गृह, अर्थ, ऊर्जा, पीडब्ल्यूडीसारख्या खात्यांसाठी मोठा रस्सीखेच सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दिल्ली गाठली असावी, असेही बोलले जात आहे.