Ajit Pawar : राजकारणात काहीही होऊ शकतं, ही म्हण आता ‘महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं’ येथपर्यंत येऊन पोहोचली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये तर अख्ख्या देशाने महाराष्ट्रातील राजकीय ट्विस्ट अनुभवले. अगदी पहाटेच्या शपथविधीपासून तर काँग्रेस-शिवसेना, भाजप-राष्ट्रवादी यासारख्या अनपेक्षित मैत्रीपर्यंत याचा अनुभव सारे घेताहेत. दहा दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा शपथविधीही नागपुरात पार पडला. आणि आता अजित पवार यांनी मी देखील मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी शक्यता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच व्यक्त करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी रविवारी राजभवनात पार पडला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्र्यांचा शपथविधी, सत्ताधाऱ्यांचे चहापान, विरोधकांची पत्रकार परिषद, देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात प्रथम आगमन असा व्यस्त रविवार माध्यमांनी अनुभवला. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि 39 मंत्री व राज्यमंत्री असे एकूण 43 मंत्र्यांचे हे सरकार आहे. यामध्ये मंत्रीपदाची एक जागा रिक्त आहे. त्याठिकाणी कुणाची वर्णी लागणार, हे वेळच ठरवणार आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि चहापान आटोपल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी गेल्या दहा दिवसांतील घडामोडींवर तिघांनीही दिलखुलास उत्तरं दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची निवड करताना प्रादेशिक समतोल कसा राखण्यात आला आहे, हे सांगितले. या मंत्रिमंडळात 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री आहेत. यामध्ये भाजपचे 19, शिवसेनेचे (शिंदे गट) 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 9 मंत्र्यांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक 10 मंत्री मिळाले आहेत, तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याला 8 मंत्रिपदं आली आहेत. यात 20 नवे चेहरे आहेत. रविवारी सकाळी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना अडिच वर्षांच्या मंत्रिपदाचे संकेत दिले होते. त्यानुसार भुजबळ, वळसे-पाटील यांच्यासारख्यांना मंत्रिमंडळात घेतले जाणार नाही, हे आधीच सांगण्यात आले असावे. पण या अडिच वर्षांच्या फॉर्म्युल्यावरूनच अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं.
Maharashtra Cabinet : देवाभाऊंच्या मंत्रिमंडळात विदर्भ, मराठवाड्याचा डंका
कधी योग येणार
अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी होणार, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर अजित पवार यांनी ‘मी देखील अडिच महिन्यांसाठी मुख्यमंत्री होऊ शकतो’ असं उत्तर दिलं आणि जोरदार हशा पिकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच त्यांनी हे विधार केल्यामुळे विविध चर्चांनाही उधाण आले. अडिच वर्षांच्या फॉर्म्युल्यामुळे भाजप-शिवसेना युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्याचीच दक्षता घेत महायुतीमध्येही अडिच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरून काही धोरण ठरले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.