खेळीमेळीच्या वातावरणात का होईना आपल्या मनातलं बोलून दाखवायला अजितदादा मागेपुढे बघत नाहीत. संधी मिळाली की षटकार मारण्यासाठी ते तयारच असतात. याची प्रचिती ठाण्यात एका कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. यावेळी भाषण देताना ‘शिंदे आणि फडणवीस यांच्यापेक्षा मी सिनीयर आहे’ असे दादांनी स्पष्टच बोलून दाखवले.
अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. विरोधात असताना असो वा सत्तेत असताना असो जे आहे ते बोलून दाखवण्यात ते कायम पुढे असतात. ठाण्यात बुधवारी (दि.७) एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. प्रा. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेलं ‘योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे’ असं हे पुस्तक आहे. प्रकाशन सोहळ्यात तीन मोठे नेते आहेत. त्यातही राजकीय व्यासपीठ नाही. त्यामुळे भाषणं जोरदार होणार याचा अंदाज सर्वांनाच होता. त्यामुळे कार्यक्रमाबद्दल उत्सुकताही होती. ठाण्यातीर गडकरी रंगायतन सभागृहात हा सोहळा पार पडला.
पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर अजितदादा भाषणासाठी उठले आणि त्यांनी पहिल्याच वाक्यापासून जोरदार बॅटिंग केली. ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदे २००० साली आमदार झाले, देवेंद्र फडणवीस १९९९ मध्ये आमदार झाले. मी १९९० मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. मी दोघांनाही सिनीयर आहे. तरीही मागे राहिलो.’ एवढेच नव्हे तर, ‘त्यांनी फक्त आमदारच इकडे आणले, मला संधी मिळाली असती तर पूर्ण पक्षच इकडे आणला असता. पण आता वेळ निघून गेली आहे,’ असेही अजितदादा म्हणाले.
ही कॅबिनेट आहे की काय आहे?
यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीचे कौतुकही केले. ते म्हणाले, ‘मी अनेक मुख्यमंत्री बघितले. पण माणसांमध्ये एवढा मिसळून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच बघतोय. कधी कधी तर ही कॅबिनेट आहे की काय आहे, असा विचार करून मीच वैतागतो.’
मीडिया आमची फॅन नाही
यावेळी शिंदे आणि फडणवीस यांच्या सतत माध्यमांमध्ये असण्याबद्दलही त्यांनी भाष्य केले. ‘मीडिया आमची फॅन नाही. त्यामुळे आमचे फोटो व्हिडियो येत नाहीत. नाहीतर बारामतीमध्ये असतो तेव्हा मी पण सकाळी सहाला शेतात जातो,’ असे ते म्हणाले आणि सभागृहात जोरदार हशा पिकला.