Mahayuti News : राज्याच्या विधिमंडळांचे पावसाळी अधिवेशन गुरूवारी (ता.27) सुरू झाले. विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच हे अधिवेशन होत आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे ते वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीनाट्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shide) अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवरायांना अभिवादन केले. तेव्हा अजित पवार त्यांच्यासोबत नसल्याने चर्चांना उधाण आले.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यावरून विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर येऊन घोषणाबाजी केली. विविध मुद्द्यावरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. काही महिन्यांत विधानसभा (Vidhana Sabha) निवडणूक पार पडणार आहेत. महायुती सरकारचे हे शेवटचचे अधिवेशन असल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी सुरू आहे. पहिल्या दिवशी विधानभवनाच्या परिसरात शिवरायांच्या स्मारकावर नेते पोहोचले.
नेत्यांकडून अभिवादन
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्यावतीने शिवरायांना अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळै चर्चांना उधाण आले आहे. महायुतीतील चांगलेच नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या मुद्द्यावरूनही विरोधक आक्रमक होण्याचे संकेत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात डबल इंजिन सरकार येईल, असे विधान केले. ट्रिपलचे डबल झाल्याबद्दलही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी महायुतीतील घटकपक्ष नाराज असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आले होते. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, महायुती पक्की आहे. राज्यात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येईल. मात्र त्यांनी ट्रिपल इंजित सरकार असा शब्द न वापरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील नाराजीनाट्य उफाळून येत आहे. अनेकदा अजित पवार गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. संघाचे मुखपत्र असो किंवा मग रामदास कदम यांनीही भाष्य केले आहे. लोकसभा निकालानंतर पराभवाचे खापर अजित पवारांवर फोडण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवारांच्या गटात नाराजी आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळातही पवारांना स्थान देण्यात आलेले नाही. जागावाटपावरुनही अजित पवार गटाने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. 2019 मध्ये तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) विधानसभेच्या 121 जागा लढविल्या होत्या. आताच्या विधानसभा निवडणुकीत 80 ते 100 जागांची मागणी अजित पवारांच्या गटाने केली आहे. आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkar) यांनीही चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांना प्रत्युत्तर दिले. पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या नाराजीनाट्याची चर्चा मात्र परिसरात रंगली होती. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहावे लागणार आहे.