NCP : घरी आलेल्या पाहुण्याला चहासाठी विचारणे ही संस्कृती झाली आहे. पूर्वीच्या काही गुळाचा खडा आणि पाणी दिले जायचे. परंतु ब्रिटिश राजवटीनंतर पाहुण्यांचा चहापान हा आता मानपान झाला आहे. त्यामुळेच पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनीही ‘चाय पे चर्चा’ हा पर्याय निवडला होता. तळपत्या उन्हामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भाचा दौरा केला होता. रामटेक लोकसभा मतदारसंघात राजू पारवे यांच्या प्रचारासाठी शिंदे यांनी भर उन्हात रॅली काढली. रॅलीदरम्यान शिंदे यांनी एका ठिकाणी थांबत भर उन्हात गरमागरम चहाचा आस्वाद घेतला होता. शिंदे यांचा हा फोटो संपूर्ण विदर्भात चांगलाच व्हायरल झाला. असाच काहीसा प्रत्यय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतीत आला आहे.
ऑक्टोबरमध्ये टाकणाऱ्या विश्वमित्राच्या उन्हाळ्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. विदर्भाच्या तुलनेत पुण्याकडे वातावरण थंडावले आहे. परंतु राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय गर्मीमध्ये वाढ झाली आहे. अशातच ‘कुल माइंड’ने प्रचारात व्यस्त असलेल्या अजित पवार यांनी तरतरी मिळवण्यासाठी तापलेल्या राजकीय वातावरणात ‘चाय की चुस्की’ घेतली. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात अजितदादा सध्या जोरदार प्रचार करीत आहेत. लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून दादा गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
राष्ट्रवादीचे लढाई
सद्य:स्थितीमध्ये आपल्या मावळ्यांच्या भरोशावर अजित पवार हे एकट्याने खिंड लढवीत आहेत. ‘मी इकडे सांभाळून घेतो, तुम्ही बाकीच्या प्रचार बघा’, असा दिलासा दादांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. त्यामुळे सध्या अजित दादा हे पायाला भिंगरी लावल्यासारखे मतदारसंघात फिरत आहेत. पहाटे लवकर सुरू होणारा प्रचार रात्री उशिरापर्यंत चालत आहे. या सर्व धावपळीत सहाजिकच थकवा हा येणारच. शरीराला ऊर्जाही लागणारच. त्यामुळे अनेकांना तजेला आणि ऊर्जा देणाऱ्या चहाचा घोट घेण्याचा मोह दादांनाही आवरला नाही.
सुनील टिंगरे यांच्यासाठी निवडणुकीचा प्रचार करताना अजित पवार वडगाव शेरी येथे पोहोचले. प्रचार सुरू असतानाच दादा एका चहाच्या दुकानावर पोहोचले. मनोज पाचपुते यांच्या मित्राचे हे चहाचे दुकान होते. दुकानदाराने दादा आल्याबरोबर त्यांच्या हातामध्ये चहा दिला. वाफाळलेल्या चहातून येणाऱ्या सुगंधाने दादांना भुरळ घातली. नेहमीप्रमाणे चहा घेण्यापूर्वी दादांनी आपल्याजवळ बाटलीतील पाण्याचे काही घोट घेतले. त्यानंतर दादांनी या गरमागरम चहाची ‘चुस्की’ घेतली. चहाचा पहिला घोट घेतल्यानंतरच दादांच्या चेहऱ्यावरून त्यांना त्याची ‘क्वालिटी’ आवडल्याचे भाव दिसत होते.
नागरिकांचा गराडा
चहा पीत असतानाच दादांच्या भोवती नागरिकांचा गराडा जमला. त्यानंतर चहा घेता घेताच दादा चर्चाही सुरू केली. उघड्या डोळ्यांनी दिसेल असा दृश्य विकास आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात करून दाखवला आहे. आपण कधीही हवेत कोणत्याही गोष्टी केल्या नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड चा विकासासाठी आपण नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. भविष्यातही यापेक्षा वेगाने विकास करण्याचा आपला मानस आहे. पण त्यासाठी नागरिकांची साथ लागणार आहे असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.