Mumbai Firing : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता. 12) रात्री मुंबई येथील निर्मल नगर परिसरात घडली आहे. गोळीबारात बाबा सिद्दीकी यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती. परंतु बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाल्याने अजित पवार यांची रविवारी 13 ऑक्टोबर रोजीची अमरावतीतील जनसन्मान यात्रा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या माध्यमातून ही माहिती प्राप्त झाली आहे.
कार्यक्रम रद्द
अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अमरावती मधील संत गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगणात मेळाव्याचेही आयोजन केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. अजित पवार अमरावतीत राजमाता जिजाऊ, डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच संत गाडगे बाबा समाधी मंदिर येथे अभिवादन करून कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते. परंतु मुंबईत बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे
अजित पवार यांच्या स्वागतासाठी काँग्रेसच्या नेत्या तथा अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी पूर्ण तयारी केली होती. अमरावती मतदारसंघासाठी अजित पवार यांनी भरघोस निधी मिळवून दिला. त्याबद्दल 13 ऑक्टोबरला अजित पवारांचे स्वागत करण्यासाठी अमरावतीत आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला आमदार म्हणून उपस्थित राहणार, असे आमदार सुलभा खोडके यांनी सांगितले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागतासाठी जागोजागी बॅनर्स लावण्यात आले होते. आमदार सुलभा खोडके या अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होत्या, अशी चर्चा वर्तुळात होत आहे. परंतु काँग्रेसने 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका सुलभा खोडके यांच्यावर लावला. खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर मुंबईत ही गोळीबाराची घटना घडली. अजित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे.
दादांच्या पोस्टमध्ये काय ?
राष्ट्रवादी काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ कार्यरत राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबार झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि दुःखदायी आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचं कळल्यावर मला धक्का बसला. मी माझा एक चांगला मित्र, सहकारी गमावला आहे, अशा शब्दात अजित पवारांनी यांनी शोकसंवेदना ‘एक्स’च्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.