Mahayuti Announcement : महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवत राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना दादांनी पंढरीच्या विठ्ठलाला नमन केले. तुकाराम महाराजांच्या ओळींनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.
वारकऱ्यांच्या दिंडीसाठी भरीव मदत दिल्याचे ते म्हणाले. दिंडीदरम्यान वारकऱ्यांची तपासणी करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. पंढरपूरच्या वारीला जागतिक वारसा म्हणून घोषित करावा, अशी मागणी युनेस्कोकडे केली आहे, असे पवार यांनी सांगितले. याशिवाय वारकरी महामंडळाची घोषणा देखील अर्थसंकल्पात करण्यात आली. याशिवाय अजितदादांनी मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली.
महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. आता लवकरच विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. अशात राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. महायुतीच्या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. त्यात त्यांनी पहिलीच योजना ही वारकऱ्यांच्या चरणी वाहिली. 2024-25 मधील अतिरिक्त अर्थसंकल्प वारकऱ्यांसाठी महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे प्रती दिंडी 20 हजार देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त बजेटमध्ये केली.
गृहिणींसाठी तरतूद
महिला ही कुटुंबाचा आधार आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या अनेक महिला आहेत. या महिलांना संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे लेकी-बहिणींसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ घोषणा करण्यात आली. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगिण विकासासाठी या योजने अंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महिलांना मोठी भेट मिळाली आहे. अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनाही जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना मदत मिळेल.
आठ लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींची 100 टक्के फी भरण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान 10 हजार होते. ते आता 25 हजार रुपये करण्यात आले आहे. राज्य सरकारने आजच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक घोषणा केल्या. 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. 10 हजार पिंक रिक्षा देण्यात येणार आहेत. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात दादांनी अनेकदा शेरोशायरीही केली.
शेतकऱ्यांसाठी घोषणा
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठीही मोठा घोषणा करण्यात आली. गाव तिथे गोदाम या योजनेची घोषणा करण्यात आली. साठी 331 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 500 रुपये देण्यात येणार आहेत. गाईच्या दुधासाठी 5 रुपयाचं अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला.
जुलैपासून हे अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी सौर कृषिपम्प देण्याची योजनाही जाहीर करण्यात आली. तकऱ्यांना अखंडित विजपुरवठेसाठी निधी मागेल त्याला सौरउर्जा प्रकल्प सांगलीच्या म्हैसाळ येथे उभारला जाणार आहे. दोन वर्षात 163 सिंचन प्रकल्प पूर्ण होतील, असे दादांनी जाहीर केले.