PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबरला वर्धा शहरात आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित आहेत. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमरावती येथील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कची प्रशंसा केली.
अजित पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रातील पावनभूमी असलेल्या वर्धेत पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध योजनांची पायाभरणी करण्यासाठी आले आहेत. यामध्ये विश्वकर्मा योजनेचा पहिला वर्धापन दिन, अमरावती येथील टेक्स्टाईल पार्कची पायाभरणी, अहल्याबाई होळकर महिला स्टार्टअपचा शुभारंभ आणि आचार्य चाणक्य कौशल योजनेचा शुभारंभ या योजनांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या वतीने पंतप्रधानांचे आपण आभार मानत आहोत.’
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांच्या स्वप्नातील भारत वास्तवात यावा अशा शुभेच्छा मी देत आहे. याशिवाय पंतप्रधानांचे व्हिजन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे,’ असेही अजित पवार म्हणाले.
उद्योगवाढीला चालना मिळेल
महायुतीचे सरकार सर्व स्तरातील लोकांसाठी काम करत आहे. त्यांच्या विकासासाठी सरकारने भरपूर आर्थिक तरतूद सुद्धा केली आहे. अमरावती येथील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे विदर्भासह राज्यातील औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार आहे. विदर्भातील पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार आहेत. या टेक्स्टाईल पार्कमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे, असेही पवार म्हणाले.
Ajit Pawar : वाचाळवीरांनो मर्यादा पाळा; मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणू नका
रोजगार निर्माण होईल
या पार्कमुळे एक लाखापेक्षा जास्त रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा अनेक योजना कमी वेळात पूर्णत्वास आणण्याचा विक्रम मोदी यांच्या नावावर आहे. मोदी यांच्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. नुकताच गडचिरोलीला मिळालेला इस्पात उद्योग सुरू केल्याने लाखो तरुणांना रोजगार मिळाला असल्याचेही अजित पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातले रोजगार मिशन पूर्ण करण्यास महायुतीचे सरकार आणि महाराष्ट्रातील जनता पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.