Farmers Issue : सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा,अतिवृष्टीची 100 टक्के नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत रविकांत तुपकर व त्यांच्या शिष्टमंडळाची मुंबई, मंत्रालयात बुधवारी (ता. ११) दुपारी बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीची 100% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून शेतीपिकांच्या संरक्षणासाठी मजबूत कंपाऊंड यांसह विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी 4 सप्टेंबरपासून मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला सर्वच स्तरातून जोरदार पाठिंबा मिळाला. शासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी आणि कार्यकर्ते पेटून उठले होते.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी शासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलनाची दखल घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावल्याचे सांगितले. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या स्वाक्षरीचे लेखी निमंत्रण तुपकरांना दिले होते.
रविकांत तुपकरांनी सरकारच्या निमंत्रणावरून आपले अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित केले होते. अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावल्याने तुपकरांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे एम.जी.एम. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तुपकरांच्या प्रकृतीत आता थोडीफार सुधारणा झाली आहे. मुंबईतील बैठकीसाठी ते रवाना झाले आहेत. आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.
रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ शेतकऱ्यांच्या मागण्या घेवून या बैठकीत सहभागी होणार आहे. संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होतात आणि कोणत्या कोणत्या मागण्या मार्गी लागतात, हे पाहूनच आता तूपकरांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे आता बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
..तोपर्यंत माघार नाही !
रविकांत तुपकर यांच्याबरोबर शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आज शासकीय बैठकीत सहभागी होणार आहे. अडीच वाजता तुपकर आणि पाच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी मुंबई सोडून जायचं नाही, असं तुपकरांनी सर्वांना सांगून ठेवलं आहे.