NCP : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पक्षातील नेत्यांना खुश करण्यासाठी मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या महामंडळावर नियुक्ती करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. महामंडळावर करण्यात आलेल्या नियुक्त्यांवरून आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खापर अजित पवार यांच्यावर
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फटका बसला. मात्र याचं खापर अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर फोडण्यात आलं. निवडणुकीनंतर महायुतीतील धुसफूस सातत्याने वाढताना दिसत आहे. नेत्यांचे एकमेकांवर आरोपांमुळे महायुतीतील वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. अशातच आता नुकतंच मंत्र्यांचा दर्जा असलेल्या महामंडळांवर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळ वाटपात फक्त शिवसेनेच्या आमदारांना संधी देण्यात आल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
प्रश्न उपस्थित
भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचं महामंडळ वाटपात नाव नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावललं जात आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या जरी शिवसेनेने महामंडळांचे वाटप केले असेल तरीपण भाजप, राष्ट्रवादी यापासून अलिप्त नाही. म्हणून राष्ट्रवादीतील जेष्ठ नेत्यांना पक्ष महामंडळावर संधी देईल, अशी आशा व्यक्त केली आहे. तर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘आमचे आमदार नाराज नाहीत. आम्हाला आता लोकांपर्यंत जायचं आणि त्यांचा आशीर्वाद मागायचा आहे. हे सगळे विषय आता बाजूलाच केलेले बरे. आपपल्या मतदारसंघांमध्ये काम करून लोकांचा विश्वास मिळवला पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मिटकरी नेमकं काय म्हणाले!
काही महामंडळांचे वाटप झाले आहेत. पण अद्याप सगळ्या महामंडळांचे वाटप झालेले नाहीत. म्हणून यावर सध्या काही बोलणे योग्य नाही. किती महामंडळ आहेत, कोणत्या पक्षाच्या वाटेला किती आले आहेत, हे पाहावं लागेल. एक ते दीड महिना निवडणुकीला आहे. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार कदाचित होणार नाही. महामंडळ देऊन प्रत्येक पक्षाचा मोराल (Moral) वाढवण्याचा प्रयत्न आहे. सध्या जरी शिवसेनेने महामंडळे दिली असतील, तरीपण भाजप राष्ट्रवादी यापासून अलिप्त नाही. म्हणून राष्ट्रवादीतील जेष्ठ नेत्यांना पक्ष महामंडळावर संधी देईल, असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला.
नाराजीचा सूर!
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सुरू असलेली धुसफूस अनेकदा बाहेर आली आहे. सध्या सत्तेत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसेच मंत्रिपदाचे वाटप होत आहे. त्यामुळे आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे.