NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) नेतृत्वात राज्यात सुरू असलेल्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरूड येथे शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर भाष्य केले. महिला, तरूण, शेतकरी यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधत आहेत. या मेळाव्यात त्यांनी विदर्भातील कांदा, कापूस, सोयाबीन आणि संत्री उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसncल्याची अप्रत्यक्ष कबुली देखील त्यांनी दिली.
पोशिंद्याचे मोठे नुकसान
कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. यामुळे शेतकऱ्यांचा विरोध महायुतीला सहन करावा लागला. मात्र, आता कांदा निर्यातबंदी होऊ नये, कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे अजितदादा म्हणाले. अजित पवार म्हणाले, ‘केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आहे. राज्यातही आपली सत्ता आहे. दोन्ही ठिकाणी सत्ता असली, तर विकासकामे खेचून आणता येतात.’ आता कांदा निर्यातबंदी होऊ नये. कापूस, सोयाबीनला योग्य भाव मिळावाय या भागात सूतगिरण्या उभारल्या जाव्यात, त्यातून रोजगार मिळावा, असा आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Prakash Ambedkar : ‘लाडकी बहीण’ नव्हे; गुलाम बनविण्याचे षडयंत्र
संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा यासाठी संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले. त्यांनी वरूड-मोर्शी येथे विदर्भ अॅग्रोव्हिजन प्रोड्यूसर कंपनी आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळासोबत संयुक्त उपक्रम म्हणून संत्रा प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचे जाहीर केले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला मिळण्यास मदत होईल. ‘संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रास्तभाव मिळणे गरजेचे आहे. संत्र्यांवर अत्याधुनिक सयंत्राद्वारे प्रक्रिया करून ज्यूस कॉन्सट्रेट, इसेन्सियल ऑइल, पिल पावडर, पशू खाद्य, ज्यूस, टेट्रापॅक ज्यूस, पेंट बॉटल इत्यादी प्रकारची वेगवेगळी उत्पादने केल्यास संत्रा फळाची मूल्यवृद्धी होऊन त्यापासून शेतकऱ्यांना चांगला अतिरिक्त मोबदला मिळू शकतो. त्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
योजनेला पाठिंबा द्या
अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. विरोधकांवर टीका करताना, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावर राजकारण करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पुतळा दुर्घटनाग्रस्त होण्याच्या घटनेबाबत त्यांनी माफी मागितली आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.