Gadchiroli News : अहेरी तालुक्यातील मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन जाणाऱ्या आई-वडिलांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुमारे 15 किलोमीटर प्रवासाची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. 6) गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदिवासी बांधवांनी वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. आदिवसींनी बुवाबाजीकडे जाऊ नये, असेही पवार म्हणाले.
जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने पवार गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे आले होते. यावेळी त्यांनी सबंध गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी बांधवांशी संवाद साधला. आपल्या भाषणादरम्यान उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधत असताना त्यांनी दोन दिवसापूर्वीच घडलेल्या हृदयद्रावक घटनेचा आवर्जून उल्लेख केला.
मनाला दु:ख
अहेरी (Aheri) तालुक्यातील पत्तीगाव येथे आपल्या आजोबांच्या गावी आलेल्या बाजीराव रमेश वेलादी या सहा वर्षाचा आणि दिनेश रमेश वेलदी या साडेतीन वर्षाच्या मुलांचे निधन झाले. या दोन्ही मुलांचा मृतदेह आपल्या खांद्यावर घेऊन तब्बल 15 किलोमीटरचा प्रवास आई-वडिलांनी केला होता. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेबाबत बोलताना अजित पवार यांनी उपस्थिताना महायुती सरकारने पाच लाख रुपयाचे विमा कवच असलेली योजना आणल्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने योजनेचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. या योजनेमधून आजारांसाठी लागणारे औषध, इंजेक्शन याचा खर्च करावा लागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने या योजनेचा लाभ घ्यावा, असे पवार म्हणाले.
वैद्यकीय सेवा उत्तम
कोणताही आजार झाल्यास पहिले वैद्यकीय सेवांचा लाभ घ्यावा. बुवाबाजी किंवा इतर कुठल्याही आधार घेऊ नये असे पवार म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी बांधवाला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळेल. यासाठी महायुती सरकार नेहमीच प्रयत्नशील राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी आदिवासी महिला व बांधवांना दिले. आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या अनेक योजनांचा पवारांनी उल्लेख केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळत असल्याचे ते म्हणाले. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात औद्योगिक विकास होत आहे. अनेक प्रकल्प गडचिरोलीत येत आहेत. त्यामुळे आगामी काळात गडचिरोलीचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असेही पवार म्हणाले. राज्यातील योजना आणखी वेगाने सुरू ठेवण्यासाठी महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे असल्याचेही पवारांनी सांगितले. यासाठी त्यांनी आदीवासी समजाने महायुतीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन देखील केले.