मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी (दि.२३) झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराने महायुतीचे समर्थन असेलल्या उमेदवाराला पराभूत केले. एमसीएच्या अध्यक्षपदावर आतापर्यंत सर्वांत तरुण अध्यक्ष विराजमान झाल्याचे सांगितले जात आहे.
अमोल काळे यांच्या निधनानंतर पूर्णवेळ अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे ही निवडणूक घेणे आवश्यक होते. अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे खास निकटवर्तीय होते. त्यानुसार पुन्हा एकदा महायुती पुरस्कृत उमेदवारावर बाजी लावण्यात आली. मात्र यावेळी अपयश हाती पडले. आणि महाविकास आघाडी पुरस्कृत अजिंक्य नाईक यांनी चुरशीच्या निवडणुकीत विजय प्राप्त केला.
या संघटनेत एकूण 375 मतदार आहेत. या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांना २२१ मतं मिळाली. तर संजय नाईक यांना ११४ मतं मिळाली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची समजली जाते. या निवडणुकीत महायुती पुरस्कृत असलेले उमेदवार संजय नाईक यांना पराभवाला सामोर जावं लागलं. तर महाविकास आघाडी पुरस्कृत असलेले उमेदवार अजिंक्य नाईक यांचा विजय झाला.
शरद पवार, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे यांनी मतदानाकडे पाठ फिरवली. त्यामुळे 375 पैकी फक्त 335 मतदारांनीच मतदान केले. एमसीएच्या मुख्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. अजिंक्य नाईक आणि संजय नाईक हे अध्यक्षपदासाठी एकमेकांच्यासमोर उभे ठाकले होते. यामुळं निवडणुकीत रंगत आली. मात्र, शरद पवार, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी आले नाहीत. याशिवाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील मतदानाकडे पाठ फिरवली.
एमसीएचे मतदार कोण आहेत?
मैदान क्लब : 211
ऑफिस क्लब : 77
शाळा, महाविद्यालय: 37
माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू: 50
एकूण मतदार: 375
असोसिएशनचं कार्यक्षेत्र
मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कार्यक्षेत्र हे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, नवी मुंबई, डहाणू, बदलापूरपर्यंत आहे. देशाच्या क्रिकेटच्या वर्तुळात मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे.त्यामुळे त्याचं अध्यक्षपद मिळवणं ही देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट मानली जाते.
जंटलमॅन गेम महत्त्वाचा – आशिष शेलार
मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे खेळाडू, प्रशिक्षक, तंत्रज्ञ आणि क्रिकेटसाठी झटणाऱ्या ध्येयवेड्यांंचा एक परिवार आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमच्यासाठी जय-पराजय महत्त्वाचा नाही. हा जंटलमॅन गेम आहे, तो त्याच पध्दतीने होणे महत्त्वाचा आहे. ही खिलाडूवृत्तीने लढलेली मैत्रीपूर्ण लढत होती, ज्यामध्ये अध्यक्ष पदी अजिंक्य नाईक यांचा विजय झाला. मी त्यांचे अभिनंदन करतो.
एकत्र काम करणार
यापुढे आम्ही सगळे मिळून असोसिएशनसाठी काम करु. मी त्यांच्या पाठीशी पुर्णपणे उभा आहे. अजिंक्य नाईक यांचा कार्यकाळ यशस्वी होईलच. आमचे उमेदवार संजय नाईक यांनी सुध्दा खिलाडूपणा दाखवून लढत दिली. आपला हा क्रिकेट परिवार आहे. यापुढे सगळ्यांंनी एकत्र काम करु या, असे माझे आवाहन आहे, असं बीसीसीआयचे खजिनदार आमदार आशिष शेलार म्हणाले.