Maharashtra Politics : या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? कुणीही ऊभा राहतो आणि काहीही बोलतो. पण कारवाई होत नाही, हे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे. रामगिरी धर्माबद्दल बोलत होते. त्यातून सरकारचा मानस समोर आला. रामगिरी महाराज सरकारची भाषा बोलत होते, असा गंभीर आरोप AIMIMचे नेते इम्तियाज जलील यांनी केला.
नागपुरात शनिवारी (ता. 7) पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, सरकार खुर्च्या वाचवण्यासाठी कुठल्या स्तराला जाऊ शकते, हे आता दिसून येत आहे. रामगिरी प्रकरण होत असेल तर झेड प्लस किंवा त्यापेक्षाही अधिक मोठी सुरक्षा व्यवस्था सरकारने दिली पाहिजे. गणपती उत्सव संपल्यानंतर आम्ही मुंबईला केव्हा जाणार, याची तारीख जाहीर करू. आमचा ताफा सर्व प्रश्नांची उत्तरे देईल.
नितेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना जलील म्हणाले की, एकाने म्हटलं की, मस्जिदमध्ये घुसून मारू. हे येवढे सोपे नाही. जेव्हा मुंबईला आमचा ताफा निघेल तेव्हा इम्तियाज जलील कोण आहे, हे माहीत पडेल, असे नितेश राणेच नाव न घेता त्यांनी सुनावले. अल्पसंख्याक समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्यारे खान यांनाही भेटलो. मुस्लिमांवर अत्याचाराच्या घटना होत आहेत. राणे उघडपणे धमक्या देत आहेत, हे त्यांच्या कानावर घातले.
राणे स्वतःची सुरक्षा करू शकत नाही
नितेश राणे स्वतःसोबत सहा-सहा बाऊंसर आणि सहा सहा गाड्या घेऊन फिरतो. जो स्वतःचं रक्षण करू शकत नाही, तो हिंदूंच रक्षण काय करणार आहे, असा सवाल करत इम्तियाज जलील यांनी पुन्हा नितेश राणेंना टोला लगावला.
बांगलादेशच्या घटनेचे आम्हीही समर्थन करत नाही. पण येथे मोर्चे काढून अशा पद्धतीचे वक्तव्य करणे, योग्य नाही. आम्ही जन आक्रोश मोर्चा काढू शकतो. आम्ही मुंबईला जाऊन लोकशाही मार्गाने विरोध करू. मुख्यमंत्र्यांना भेटून संविधानाची प्रत देणार देऊ. एकेकाळी मुंबई पोलिसांची ख्याती होती. मात्र अशा पद्धतीच्या घटना होऊनही काहीच कारवाई होत नाही, हे खेदजनक आहे.
महाविकास आघाडीत तीन खुर्च्या
राज्यातील महिलांना 1500 रुपये देऊन मते विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ते येवढे सोपे नाही. महाविकास आघाडीच्या मोठमोठ्या नेत्यांसोबत आमची चर्चा झाली आहे. आमची 25 जागांची ताकत असेल, तर आम्ही 25 जागा मागू. आम्ही 100 जागांवर चर्चा करणार नाही. महाविकास आघाडीत तीन खुर्च्या आहेत.थी खुर्ची लावून त्यांना आम्हाला त्यांच्या बाजूला बसवायचे नाही. 9 तारखेनंतर आम्ही किती जागा लढायच्या, हे आमचा पक्ष ठरवेल. जिथे जिथे चांगले उमेदवार मिळतील, तिथे पुन्हा ताकतीने आम्ही विधानसभेच्या मैदानात उतरू.
हिंमत असेल तर नागपूरचं नाव बदला
हिम्मत असेल पुण्याचं नाव बदलावा. कोल्हापूरचं नाव बदला. दीक्षाभूमी आहे, त्या नागपूरचं नाव बदला. मी एमआयएमचा माजी खासदार म्हणून सांगतो, मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ठेवा. आमच्या शहरात येऊन फक्त राजकारण करायचं होतं. म्हणूनच नाव बदललं. अनेक वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे आले होते. त्यांनाही हेच करायचं होतं. यामध्ये काहीतरी ऐतिहासिक संबंध असला पाहिजे, असे इम्तियाज जलील म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तेव्हा एक पिल्लू अहमदनगरला पाठवलं, त्याने मशिदीत घुसून मारण्याचं वक्तव्य केलं, असा जोरदार टोला त्यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला.