Criticization on Kangana Ranaut : छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपच्या खासदार कंगना रनौत यांच्यावर टीका केली आहे. ‘पहिल्यांदा लोकसभा पाहायला मिळतेय, म्हणून काहीही बोलायचं. मीडियाच्या लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी अनेक लोक असे बोलतात’, अशी टीका त्यांनी कंगनावर नाव न घेता केली. यापूर्वी माजी खासदार नवनीत राणा यांच्यावरही जलील यांनी टीका केली होती.
हिमाचलमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार कंगना रनौत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘सगळ्यात जास्त ड्रग्सचा कारभार हिमाचलमध्ये चालतो. कंगना रनौत या तर तिथल्या खासदार आहेत. दुसऱ्यावर बोट दाखवताना कंगना रनौतने आपल्या राज्यात कशाप्रकारे ड्रग्सचा कारभार चालतो, त्यावर लक्ष दिलं तर चांगलं होईल.’
अमरावतीची एक खासदार होती. तिला माहीत होतं की आपण काहीतरी वेगळं बोललं की मीडियात आपल्यावर फोकस येतो. मात्र सगळ्यांना माहित आहे की काय झालं. आता ही नवीन बाई आली आहे दररोज काही ना काही तरी बडबड करते, असं छत्रपती संभाजी नगर येथे माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणालेत.
जरांगे -एमआयएमच्या युतीबाबत भाष्य
मनोज जरांगे पाटील आणि एमआयएमची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावरही जलील यांनी भाष्य केलंय. जातीच्या आधारावर निवडणुका लढायला सुरुवात केली तर हा देश, हे राज्य कुठे जाईल माहित नाही? आपण सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चाललो तर हाच चांगला प्रयोग असेल. सगळ्या जातीत चांगले लोक असून तुम्ही सगळ्यांना संधी दिली तर चांगले होईल, असं इम्तियाज जलील म्हणाले.
नवनीत राणांवरही शाब्दिक हल्ला
लोकसभा निवडणुकीपूर्वी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्यातील कलगीतुरा अधिकच वाढलेला होता. या कलगीतुऱ्यात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उडी घेतली होती. जलील यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्ला केला. हा हल्ला करताना त्यांची जीभ घसरली. ‘तुम्ही या चिल्लर लोकांना एवढं महत्त्व का देता? माझ्या नजरेत अतिशय चीप दर्जाची महिला आहे. प्रसिद्धीसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकते. पब्लिसिटीसाठी मंदिरात न जाता उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचायचं म्हणत होती. 10 मिनिटे कॅमेरासमोर तुला दाखवतो असं म्हटल्यास ती 10 मिनिटे एकटी नाचेल. तिला इथं प्रचाराला बोलावलं. भाजपाला कोणीतरी भूंकणारं हवं आहे. अमरावतीवरून हे पार्सल आणलं आहे आता त्यांची मैफल सजेल,’ असा हल्लाच इम्तियाज जलील यांनी चढवला होता.