Congress Politics : काँग्रेसने मुस्लिम मतदारांना गृहित धरले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांना डावलत काँग्रेस प्रचार करीत आहे. अनेक मतदारसंघातील उमेदवारी मुस्लिम समाजाच्या वस्त्यांमध्ये फिरण्यास तयार नाहीत. कितीही वाईट वागणूक दिली तरी मुस्लिमांचे मतदान आपल्यालाच मिळणार असा समज काँग्रेसचा आहे. त्यामुळे काँग्रेसला ज्यांचा जागा दाखवून द्या, असे आवाहन आता एमआयएम ने केले आहे. यासंदर्भात चंद्रपूरचे एमआयएम जिल्हाध्यक्ष अजहर शेख यांनी सोशल मीडियावर आघाडी उघडली आहे.
अजहर शेख यांनी काँग्रेसच्या ‘मॅडम’चा उल्लेख करीत सोशल मीडियावर मुस्लिम समाजाला जागृत करण्यासाठी पोस्ट व्हायरल केल्या आहेत. ‘द लोकहित’शी बोलताना अजहर म्हणाले की, काँग्रेस मुस्लिमांना आपल्या पायातील चप्पल समजते. आपण घरात आल्यानंतर गुर्मीने चप्पल फेकुन देतो. त्यानंतर अडगळीत टाकून देतो. जेव्हा लागेल तेव्हा पुन्हा पायात घालतो. अगदी त्याच पद्धतीने काँग्रेस मुस्लिम समाजाचा वापर करीत आहे. काँग्रेसने केवळ सत्तेसाठी मुस्लिमांचा वापर केला. काँग्रेसचे लोक डोक्यावर मुस्लिम टोप्या घालण्याचे नाटक करतात. त्यानंतर अन्य ठिकाणीही जाऊन डोके टेकवतात.
काँग्रेसला खरच मुस्लिम समाजाबद्दल काही वाटले असते तर त्यांनी या समाजाची गरीबी, बेरोजगारी दूर केली असती. आजही मुस्लिम समाज असाक्षर आहे. मुस्लिम समाजाला बोटावर मोजण्याइतक्या सरकारी नोकऱ्या आहेत. मुस्लिम समाजासाठी खास कोणत्याही योजना नाही. काँग्रेसने मुस्लिम समाजाला उच्च शिक्षण मिळू दिले नाही. त्याचे कारण म्हणजे हा समाज शिकला असता तर त्याला चांगल्या वाईटातील फरक कळला असता. त्यामुळे काँग्रेस केवळ मुस्लिमांचा सत्ता उपभोगण्यासाठी वापर करीत असल्याचे अजहर शेख म्हणाले. विदर्भासह देशभरातील मुस्लिमांनी आता काँग्रेसच्या मागे धावणे बंद केले पाहिजे. मुस्लिमांची मुले आजही गरीब झोपड्यांमध्ये राहतात. त्यांना दोनवेळचे अन्न मिळत नाही. त्यामुळे या समाजाने आता काँग्रेस व्यतिरिक्त त्यांच्यासाठी लढणाऱ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे, असे आवाहनही शेख यांनी केले. काहीही झाले तरी काँग्रेसला पाठिंबा देऊ नका असे मजहर शेख यांनी म्हटले आहे.
दलितांवरही अत्याचार
देशात दलितांवरही अत्याचार झाले आहेत. काँग्रेसनेच राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळू दिला नाही असा आरोप सतत होतो. हाच आरोप एमआयएमनेही केला आहे. मुस्लिम समाजाप्रमाणे काँग्रेसने दलित समाजालाही मुर्ख बनविले आहे. त्यामुळे या देशातून आता काँग्रेस नावाची कीड उखडून फेकण्याची गरज असल्याचे शेख यांनी नमूद केले.