Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात खरीप 2023 व रब्बी हंगाम 2023 मध्ये विविध प्रकारच्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने पीक विमा प्रलंबित आहे. हा पीक विमा येत्या 31 ऑगस्टच्या पूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपनीला दिले. या बैठकीला खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांची देखील ऑनलाईन उपस्थिती होती.
ठोस कारणे दाखवा
पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचा पिक विमा नाकरायचा असेल तर त्यासाठी ठोस कारणे द्यावी लागतील. विशिष्ट मुदतीत पिक विमा नाकारणे बंधनकारक आहे. या अटींचे पालन पीक विमा कंपनीने केले नसल्यामुळे त्यांच्यावर प्रसंगी एफआयआर करण्यास मागे पुढे बघणार नाही, असा सज्जड दम कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपन्यांना या बैठकीत भरला.
यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींनी देखील मागणी केली. त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2023 मध्ये प्रलंबित पीक विम्याचा विषय निकाली काढण्यासाठी कृषीमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी आमदार आकाश फुंडकर म्हणाले की, ‘अनेक शेतकऱ्यांनी 72 तासात तक्रारी देऊनही त्यांना विमा मिळाला नाही, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानाचे पंचनामे देखील त्यांनी बसल्या जागेवरच केले. त्यामुळे शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहिले आहे.’
रक्कम जमा होणार
यावर कृषी मंत्री म्हणाले की, ‘बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडून पीक विम्याबाबत हरकती दाखल करण्यास 72 तासांपेक्षा जास्त उशीर झाला आहे. किंवा ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाइन तक्रारी दाखल केल्या असतील त्या सर्व तक्रारी ग्राह्य धराव्या. 31 ऑगस्ट पर्यंत अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवून विम्याची रक्कम अदा करावी, असे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. या बैठकीतील निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2023 चे 119 कोटी तर खरीप हंगामातील 55 कोटी रुपये येत्या 31 ऑगस्ट पूर्वी खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधी यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.
या बैठकीस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, आ.संजय रायमूलकर, आ.श्वेताताई महाले, आ.संजय गायकवाड, आ.डॉ.संजय कुटे, कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती व्ही.राधा, उपसचिव प्रतिभा पाटील, उपसचिव नीता शिंदे, भारतीय कृषी विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक मच्छिन्द्र सावंत, कृषी आयुक्तालयाचे वैभव तांबे, कृषी संचालक विनायकुमार आवटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे, भारतीय कृषी विमा कंपनीचे उपप्रबंधक सचिन हराळ, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अभिजित उद्धव आदी उपस्थित होते.