Dhangar community : विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. आता प्रत्येक समाज आपल्या समस्यांसाठी आक्रमक झालेला आहे. आरक्षणावरून तर रण पेटलेलं आहे. अशात धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. रविवारी सोलापुरात भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घरापुढेच धनगर आंदोलकांनी ढोल वाजवले. या ढोल बजावो आंदोलनातून त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नाची आठवण सत्ताधाऱ्यांना करून दिली.
उपोषण सुरू
आरक्षणासाठी पंढपुरात धनगर समाजबांधव उपोषणावर बसले होते. त्यातील एका कार्यकर्त्याची प्रकृती खालवल्यानंतर राज्यभर आंदोलन पेटलं. राज्यभरातील लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर जाऊन धनगर आंदोलक ढोल वाजवत आहेत. सोलापूरमध्ये देखील धनगर समाजाच्या आंदोलनाने आक्रमक रूप घेतले आहे. सोलापुरात माजी सहकार मंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर धनगर रविवारी आंदोलकांचे ‘ढोल बजावो आंदोलन’ झाले. धनगर समाज आक्रमक होताच आमदार सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या सुभाष देशमुख यांच्या घराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
सुभाष देशमुख यांना निवेदन दिल्याशिवाय ‘ढोल बाजावो आंदोलन’ मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. वारंवार उपोषणं, आंदोलनं सुरू आहेत. असं असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधव राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करीत आहेत. दरम्यान धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलकांनी लोकप्रतिनीधींना धारेवर धरलं आहे. सोलापूर येथे आमदार सुभाष देशमुखांच्या घरासमोरही आंदोलकांनी ‘ढोल बजाओ आंदोलन’ करून आपली मागणी रेटून धरली.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन सुरू आहे. सकल धनगर समाज संघटनेच्या वतीने या आंदोलनाची घोषणा करण्यात आली. 9 सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरु झाले आहे. पंढरपूरमध्ये. ‘ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष्य’ असा नारा देत या आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
Reservation : गडकरी म्हणाले, ‘इंदिरा गांधींना आरक्षण होते का?’
विषारी औषधाचे प्राशन
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी एका सरपंचाने उपोषणाच्या ठिकाणी विषारी औषध प्राशन केले. आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पंढरपूरमध्ये धनगर आरक्षणाची मागणी करताना ग्रामीण भागातील अमोल देवकते यांनी विष प्राशन केले. देवकते हे आलेगाव येथील सरपंच आहेत.धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील धनगर समाज बांधवांकडून पंढरपूमध्ये उपोषण करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून धनगर समाजाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपोषणस्थळी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सरपंचाने विषारीऔषध प्राशन केले.