महाराष्ट्र

Ravi Rana : टीकेची झोड उठल्यानंतर सारवासारव

Ladki Bahin Yojna : मतदान केले नाही, तर दीड हजार परत घेईल

Amravati Politics : अमरावती शहरापासून जवळच असलेल्या बडनेरा विधानसभेचे अपक्ष आमदार रवी राणा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजपने रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित कार्यक्रमात राणा यांनी आपल्याला निवडणुकीत आशीर्वाद अर्थात मतदान केले नाही, तर दीड हजार रुपये परत घेऊ, असे विधान केले. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा, भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडेही यावेळी मंचावर होते. त्यामुळे वादाला सुरुवात झाली.

आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने यावर आक्षेप घेतला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राणा यांच्या या वक्तव्यावर तिखट शब्दात प्रहार केला. बहिणींना देण्यात येणारी रक्कम कोणाच्या बापाची नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. काँग्रेसनंतर स्वत: भाजपच्या नेत्यांनीही रवी राणा यांच्यावर टीका केली. भाजपचे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनीही राणा यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी राणा यांच्या या एकूणच कार्यक्रमावर हरकत घेतली.

विरोध कायम

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना महायुतीमधून तीव्र विरोध होता. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पार्टी राणांच्या विरोधात होती. त्याचा फटकाही राणांना बसला. नवनीत राणा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. नवनीत राणा यांच्यानंतर आता रवी राणा यांना बडनेरा मतदारसंघातून पराभूत करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडील नेते कामाला लागले आहेत. अशात महिलांच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे राणा वादात सापडले आहेत. आपल्या वक्तव्यावर राणा यांनी सारवासारवही केलीय.

बहिण भावाच्या नात्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण असते. त्यामुळे आपण गमतीच्या अर्थाने हे बोललो. सगळ्या महिला तेव्हा हसत होत्या.

बहिण भावाच्या नात्यात थट्टामस्करी चालत असते. ही मस्करी आपुलकीची असते. प्रेमाची असते. जिव्हाळ्याची असते. त्याच नात्यांने आपण हे बोललो. मात्र विरोधक त्याचा बाऊ करीत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे घसरली आहे. येणाऱ्या काळामध्ये महायुतीचे सरकार आल्यावर दीड हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपये दरमहा करण्याची मागणीही आपण केल्याचे राणा म्हणाले. आशा वर्कर मदतनीस यांचा पगार वाढावा ही मागणी देखील केल्याचे राणा यांनी सांगितले.

विरोधकांनी लक्षात घ्यावे

विरोधकांनी काही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे. भाऊ आणि बहिणींच्या नात्यामधली थट्टेवरून विरोधक राजकीय पोळी शेकत आहेत. भाऊ बहिणीला देत असतो. बहिणीकडून कधीही कोणतीही गोष्ट परत घेत नसतो, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असे राणा म्हणाले. राणा दाम्पत्य आणि वाद यांचे एकमेकांशी जवळचे नाते आहे. आपली कृती आणि वक्तव्यातून ते नेहमीच चर्चेत राहतात. अशात आता महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळै राणा यांना निवडणुकीत कोणते परिणाम भोगावे लागतील हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!