Akola District तेल्हारा तालुक्यातील मनब्दा येथील अवैध सावकाराकडून ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट करीत सरकारवर निशाणा साधला. राज्यातील शेतकऱ्यांना छळणाऱ्या सावकारांसोबत तरी सेटलमेंट करू नका अशा शब्दात वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली होती. आता अकोला सहकार विभागाने आज तेल्हारा तालुक्यातील ‘त्या’ सावकाराच्या घरी धाड टाकली. धाडीत आक्षेपार्ह साहित्य जप्त केल्याची माहिती सहकार विभागाने दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनी सावकार दादागिरी करतानाचा एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केला. एका सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारा तसेच मनाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. दरम्यान यानंतर आता सहकार विभागाने छापे टाकले आहेत.
सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील ‘त्या’ सावकाराचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी ‘त्या’ सावकाराकडून तपासणी दरम्यान जिल्हा उपनिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 6 खरेदी कागदपत्रे आणि झेरॉक्स प्रती 3, बँक पासबुक 17, चेक बुक 2, खुले धनादेश 2, सोबतच दोन ईसार पावत्या, कोरे स्टॅम्प । याशिवाय इतर काही प्रॉपर्टी 5 कागदपत्रे असे 38 कागदपत्र शेळके यांच्या निवासस्थावरुन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकारी प्रवीण लोखंडे यांनी दिली.
शेती पचवल्याचा आरोप
दरम्यान, मनब्दा गावातील हरिभाऊ गतमणे या शेतकऱ्याची चार एकर शेती सावकाराने पचवल्याचा आरोप शेतकऱ्याने केला होता. पैसे परत केल्यानंतरही शेतीचा शेळके आणि भोजने यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकरी गतमणे यांचा मुलगा संदीपला 17 मे रोजी शेतातच चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तर वृद्ध शेतकरी हरिभाऊ गतमणेंवर प्राणघातक हल्ला देखील चढविला होता. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणी सावकार मनोहर शेळकेच्या दोन मुलांसह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
शिवणीतील सावकारावर गुन्हा दाखल!
सहकार विभागाने दिलेल्या माहिती नुसार अकोल्यातील शिवणी येथील एका सावकारावर अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकार विभागाकडील सुनावणीमध्ये दाखल करण्यात आलेले जबाब, अर्जदार व गैरअर्जदार यांचे पुरावे तसेच युक्तीवाद यांचे आधारे तसेच धाडीदरम्यान जप्त करण्यात आलेले कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प, करारनामे, डाय-या यावरून गैरअर्जदार शेख मुश्ताक शेख लतीफ हे विना परवाना सावकारी व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले. त्यानुसार कु ज्योती मलिये, उपनिबंधक, सहकारी संस्था, तालुका अकोला यांनी पारित केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2024 चे कलम 39 अन्वये शेख मुश्ताक शेख लतीफ, रा. इंदिरा नगर, शिवणी, अकोला यांच्या विरुध्द पोलिस स्टेशन, एम. आय. डी. सी. अकोला येथे दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.