राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून ही ऑडिओ क्लिप ट्वीट करण्यात आली आहे. यात जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. ‘जाऊ दे, मरु दे तिला, तू कशाला बदनाम होतो?’ असा संवाद यात आहे. यावरुन आता राजकारण सुरू झाले आहे. ‘मी ती व्हिडिओ क्लीप ऐकली आहे,’ असे म्हणत आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरच हल्लाबोल केला आहे. व्हायरल व्हिडिओ क्लीपमध्ये, जितेंद्र आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारी यांच्यात संवाद सुरू आहे. त्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. आव्हाड यांनी ठाकरेंना थेट ‘सुपारी ठाकरे’ असं म्हटलंय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा एक ऑडिओ शेअर केला आहे. यात जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी या व्यक्तीशी संवाद साधत आहेत. ही ऑडिओ क्लिप 4 वर्षांपूर्वीची असल्याचं बोललं जात आहे. ट्वीटनंतर हा ऑडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या ऑडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी ‘जाऊ दे, मरु दे तिला, तू कशाला बदनाम होतो?’ असं म्हटलं आहे. शिवाय मल्लिकार्जुन पुजारी या कार्यकर्त्याला शिव्याही घातल्या आहेत. ‘हा ऑडियो ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी शप्पथ घेतली होती ना?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
राज ठाकरेंनीच माझा आवाज काढला
राज ठाकरे बदलापूरला आतापर्यंत का गेले नाहीत? अशा प्रकरणात माणुसकीच्या नात्याने 24 तासात पोहोचायला हवं. मराठी मनाचा अभिमान असणारे राज ठाकरे… तुमचा हात त्या पोरीच्या आईच्या डोक्यावरुन, पोरीच्या बापाच्या डोक्यावरुन फिरवायला हवा होता. ते न करता माझ्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतात, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मी जर म्हटलं की, हा आवाज माझा नाहीच. तर हे तपासायला जाणार आहेत का? मी सांगतो हा माझा आवाजच नाही. राज ठाकरे कोणाचाही आवाज काढतात. त्यांनीच माझा आवाज काढून क्लिप तयार केली. सर्वांना माहित आहे ते किती मोठे मिमिक्री आर्टिस्ट आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
जितेंद्र आव्हाड यांचा व्हायरल होणारा हा ऑडियो खरा आहे की खोटा, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच तो किती वर्षे जुना आहे, या ऑडियोत संवाद साधणारी व्यक्ती नेमकी कोण, नेमके कोणाबद्दल बोलत आहेत, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.