पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये भरधाव पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिली. त्या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला. नंतर तो उघडकीस आला. सदर प्रकरण राज्यभर गाजत असताना अगदी तसाच घटनाक्रम शेगावमध्ये घडला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात हा प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणीही आलिशान कार ने दुचाकीस्वाराला चिरडल्यानंतर कारचा चालक बदलण्यापासून रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत प्रयत्न झाला. मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणातील आरोपी हा मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
शेगाव ते खामगाव रोडवर चिंचोली फाटा येथे एक कारने दुचाकीला चिरडले होते. २ जुलैला ही घटना घडली. यात एक जण जागीच ठार झाला. वैभव सदाशिव शिंदे (२४ रा. चिंतामणी नगर सुटाळपुरा खामगाव) खामगाववरून शेगावकडे पल्सरने बाईकने निघाला होता. त्यावेळी शेगावकडून खामगावच्या दिशेने जाणाऱ्या ह्युंदाई कंपनीच्या अल्काझर या कार ने त्याला धडक दिली होती.
अपघातानंतर पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात जे घडले तेच येथे करण्याचा प्रयत्न झाला. अपघातांनंतर अचानकपणे खामगाव शहरातील अताउल्लाह खान नामक इसम समोर आला आणि आपल्या हातून हा अपघात घडल्याचे सांगितले. काही घडामोडी घडल्या आणि त्यांनतर मृतकाच्या नातेवाईकांनाही अताउल्लाह खान इसमाच्या नावाची तक्रार पोलिसात दाखल केली. आणि प्रकरण दाबले गेले.
मात्र मुळ आरोपीच्या एका नजीकच्या नातेवाईकानेच या प्रकरणाचे बिंग फोडले. सुरुवातीला हे प्रकरण निपटण्याचे प्रयत्न झाले. मात्र वरिष्ठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघात प्रकरणात खरा आरोपी समोर आला. स्वतःहून समोर आलेल्या चालक इसमाची उलट तपासणी करताच आपण गुन्हा अंगावर घेतल्याचे त्याने मान्य केले. बदललेल्या आरोपीने नातीच्या लग्नासाठी गुन्हा अंगावर घेतल्याची कबुली दिली.
गावातील एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून त्याने हा प्रकार केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. पोलिसांनी यातील खऱ्या आरोपी चालकाला अटक केली आहे. विनम्र विक्रम नागवाणी असे आरोपी चालकाचे नाव आहे. यासंदर्भातील माहिती शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांनी दिली.