Forest Minister Sudhir Mungantiwar : राज्यातील सर्वसामान्य विजग्राहकांची कुठल्याही प्रकारची गौरसोय होऊ नये, ही गोष्ट ध्यानात ठेवूनच राज्य सरकारने प्रत्येक निर्णय घेतला आहे. प्रीपेड वीज मीटरच्या संदर्भातही त्याच दृष्टीकोनातून स्मार्ट निर्णय घेण्यात आला आहे. अशी भूमिका राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली.
घरगुती विजग्राहकांच्या भावना लक्षात घेत मुनगंटीवार यांनी स्मार्ट प्रीपेड मीटर संदर्भात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली होती. प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात घरगुती वीजग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. या चर्चेनंतर घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयानंतर सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे.
संभावित तोटा कमी व्हावा..
यासंदर्भात माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले की, वीज वितरणाच्या दरम्यान संभावित तोटा (Potential Loss ) कमी व्हावा किंवा रोखता यावा या उद्देशाने, तसेच वीज वितरण कंपन्यांचे गुणवत्ता व विश्वासार्हतेचे निर्देशांक वाढावे, मानवी चुका कमी व्हाव्यात, जलद ग्राहक सेवा मिळावी तसेच उत्तम सुविधा ग्राहकांना मिळाव्यात या उद्देशाने स्मार्ट मीटरची योजना जुलै २०२० मध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून तयार करण्यात आली होती. परंतु, स्मार्ट मीटर बसविण्यासंदर्भात घरगुती ग्राहकांमध्ये असलेला रोष व अस्वस्थता बघून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
Bhandara Politics : नानांचा गड भेदण्यासाठी महायुतीची व्यूहरचना
आता राज्यात ही योजना सरकारी कार्यालयासाठी राबविण्यात येणार आहे. घरगुती वीज वापरासाठी मात्र स्मार्ट मीटर राहणार नाही, यावर स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरगुती वीज ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.