महाराष्ट्र

Assembly Election :  क्लीन स्वीपनंतर  ‘वंचित’ पुन्हा आखाड्यात!

Prakash Ambedkar : सातही विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती

Vanchit Bahujan Aghadi :  लोकसभा निवडणुकीत ‘क्लीन स्वीप’नंतर आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे.  शनिवारी (ता. 22) आणि रविवार (ता. 23) बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखत होणार आहेत. त्यासाठी इच्छुकांची नावे मागविण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मतांचे विभाजन करणारा ‘फॅक्टर’ ठरला. अनेक ठिकाणी त्यांच्यावर आरोपही झालेत. अकोल्यात तर प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे भाजपला फायदा झाल्याचे मतांच्या आकडेवारीवरून दिसते.

बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव विधानसभेसाठीदेखील मुलाखती दोन दिवसात होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांच्यासह इतर प्रमुख नेते हे मुलाखती घेणार असल्याची माहिती आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) नीलेश जाधव, महासचिव प्रशांत वाघोदे, महासचिव विष्णू उबाळे, उत्तर जिल्हाध्यक्षांसह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. इच्छुकांनी मुलाखतीसाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वबळ कमी पडले

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव पहायला मिळाला. विशेष म्हणजे, नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर यांना आपली अनामत रक्कम देखील वाचवता आली नव्हती. बहुतांश दलित व मुस्लीम मतदारांनी यावेळेस वंचित बहुजन आघाडीकडे पाठ फिरवली होती. वंचित बहुजन आघाडीला मतदान केले तर त्याचा भाजपला फायदा होतो. भाजप बहुमताने सत्तेवर आले तर संविधान बदलाची भीती आहे, ही बाब चर्चेत होती. त्यामुळे ओबीसी, दलित व मुस्लीम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान टाळल्याचे दिसून आलेले आहे.

अकोल्यातून ‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. परंतु स्वाभिमानी बाणा अशी ओळख असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी पराभव पचवत, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लावले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, मलकापूर, खामगाव व जळगाव जामोद या सातही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

Yoga Day : नरेंद्र मोदी अन् प्रतापरावांचा असाही योगा‘योग’

22 जूनला दुपारी 12:30 वाजता बुलढाणा विधानसभेसाठी शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे मुलाखती होणार आहेत. चिखली विधानसभेसाठी दुपारी 3:30 वाजता चर्चा होईल. शासकीय विश्रामगृह चिखली येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत. 23 जूनला दुपारी 12:30 वाजता मेहकर विधानसभेसाठी शासकीय विश्रामगृह मेहकर येथे उमेदवारांच्या नावांची चाचपणी होईल. दुपारी 3:30 वाजता सिंदखेडराजा विधानसभेसाठी शासकीय विश्रामगृहात चर्चा केली जाईल. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा जिल्हा प्रभारी प्रा. धैर्यवर्धन पुंडकर व पदाधिकारी या मुलाखती घेणार आहेत. यामध्ये महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सविता मुंडे यांचाही समावेश असेल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!